"मला फक्त घरी जायचंय...", वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? (Photo Credit - X)
वेस्ट इंडीज संघ मायदेशी परतण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध ठरत आहे. मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक देशांनी हवाई हद्द (Airspace) बंद केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली आहेत. वेस्ट इंडीजला मायदेशी जाण्यासाठी मध्य-पूर्वेतील हवाई मार्गाचा वापर करावा लागतो, जो सध्या युद्धामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मागील पाच दिवसांपासून विमानतळ आणि हॉटेलच्या फेऱ्या मारत आहेत. कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने संतापलेले मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर दोन भावूक पोस्ट केल्या आहेत.
I just wanna go home — Daren Sammy (@darensammy88) March 5, 2026
At least an update, tell us something. Today tmw, next week. It’s been 5 days — Daren Sammy (@darensammy88) March 5, 2026
“मला फक्त घरी जायचे आहे,” असे सॅमी यांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी दुसरी पोस्ट करत प्रशासनावर निशाणा साधला. “किमान एक अपडेट तरी द्या! आम्ही आज जाणार आहोत, उद्या की पुढच्या आठवड्यात? पाच दिवस झाले आहेत, पण काहीच स्पष्टता नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
या गंभीर विषयावर क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) अखेर मौन सोडले असून एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आयसीसी (ICC) आणि संबंधित सरकारी संस्थांच्या सतत संपर्कात आहोत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यांना सुरक्षित मार्गाने लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे,” असे बोर्डाने स्पष्ट केले.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजची सुरुवात अत्यंत दिमाखदार झाली होती. ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी एकही सामना न गमावता वर्चस्व गाजवले होते. मात्र, सुपर-८ मध्ये त्यांना आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर भारताविरुद्ध ईडन गार्डन्सवर पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभवांमुळे त्यांचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले आणि आता युद्धाच्या सावटाखाली त्यांना भारतातच प्रतीक्षा करावी लागत आहे.






