पुणे : पुणे महानगर पालिकेतील निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आरोग्य विभागामध्ये नियमबाह्य कामे करण्यास सांगितल्याचा आरोप निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. या पत्रानंतर विरोधक संतापले असून अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते आणि कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
डॉ. भगवान पवार यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे. पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली असा आरोप विजय वड्टेटीवार यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, “आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे. अँब्युलन्स घोटाळा पासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जाणते समोर आणत आहेत. या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडरसाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये. तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे,” अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका महायुती सरकारवर केली आहे.