विठुमाऊली येणार, तयारीही दिमाखदार! नातेपुतेतील पालखी मुक्कामस्थळाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
टाळ वाजे, मृदंग वाजे… वाजे हरीचा वीणा, माऊली निघाली पंढरपुरी…! आषाढी वारीचे दिवस जवळ येताच वारकरी भक्तांबरोबरच प्रशासनालाही वारीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर पहिला मुक्काम नातेपुते येथे होत असल्याने पालखी तळावरील सुविधांची तयारी प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन यांनी आज नातेपुते येथील पालखी तळाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.(फोटो सौजन्य – AI)
पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
यावेळी पालखी तळ, मुक्काम परिसर तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची सविस्तर पाहणी करण्यात आली. पाहणी दौऱ्यादरम्यान प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार सुरेश शेजूळ, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अस्मा आतार, पर्यवेक्षिका नंदा बिरलिंगे, मंडल अधिकारी चंद्रशेखर लोखंडे, महावितरणचे शाखा उपअभियंता भारत खिलारे तसेच नातेपुते पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोनल मोरे उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देत स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
पालखी तळावर स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अखंड वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन आणि सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक मानली जाते.
पालखी तळालगत जाणाऱ्या जुन्या नातेपुते-पिराळे रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत यांच्यातील अधिकारक्षेत्राचा वाद बाजूला ठेवून माऊली चौक ते ४५ फाटा पालखी तळ रस्ता विशेष निधीतून तातडीने सुस्थितीत करावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन यांनी नातेपुते मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते येथे होत असल्याने लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पालखी तळावरील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधला जात असून वारी निर्विघ्न पार पाडण्यावर भर दिला जात आहे.






