संग्रहित फोटो
पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीत नगर रस्त्यावरून वाघोली ते लोहगाव येथून पिंपरी चिंचवडला जोडणार्या सुमारे ५.७ कि.मी. रिंग रोड आणि सर्व्हिस रस्त्याचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे २१२ कोटी रुपये खर्च येणार असून या खर्चाला इस्टीमेट कमिटीने मान्यता देखील दिली आहे. या रस्त्यामुळे नगर रस्त्यावरून येरवडा मार्गे पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना शहरात यावे लागणार नसल्याने वडगाव शेरी परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागातून रिंग रोड प्रस्तावित आहे. या रस्त्यासाठीचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. ६५ मी. रुंदीच्या या रस्त्याचा काही भाग हा वाघोली येथून लोहगावमधून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जातो. नगर रस्त्यावरील वडगाव शेरी, खराडी, येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रिंग रोड फायदेशीर ठरणार आहे. महापालिकेेने हा रस्ता करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सल्लागाराकडून अहवाल तयार करून घेतला असून मंगळवारी झालेल्या एस्टीमेट कमिटीमध्ये मान्यताही देण्यात आली आहे.
हा रस्ता ६५ मी. रुंद असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हीस रस्ते असतील. तसेच पावसाळी गटारे आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सिग्नल्सची व्यवस्थाही असेल. या कामासाठी २१२ कोटी रुपये खर्च असून पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील ५७ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २१७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यांच्या खर्चाला इस्टीमेट कमिटीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच शहरातील ६० चौक आणि दुभाजकांचे बीओटी तत्वावर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सुशोभिकरण आणि सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींची रंगरंगोटी करण्याची तयारी दर्शविलेल्या शहरातील उद्योजक आणि व्यावसायीकांसोबत आज बैठक घेण्यात आली. चौक आणि दुभाजकांवरील सुशोभिकरणासोबतच लगतच्या भागात सामाजिक संदेश देणारे म्युरल्स व अन्य बाबींची कामे देखिल करण्याची तयारी तसेच पुढील ३ ते ५ वर्षे मेन्टेनन्स करण्याची तयारी देखिल या व्यावसायीकांनी दर्शविल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.