File Photo : Santosh Deshmukh सुरेश धस यांच्यासह बीड प्रकरणात विरोधी पक्षांची भूमिका काय आहे
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून सीआयडी पथक बीडमध्ये ठाण मांडून बसले असून, रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली. तसेच चार ते पाच महिलांना बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते. तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. अद्याप त्यांची नावे समोर आली नसली, तरी खंडणी प्रकरणातील आरोपीच्या जवळचे असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरताना दिसत आहे.
वाल्मिक कराड फरार
एकीकडे राज्यातून या हत्येवरुन संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. वाल्मिक कराड सध्या फरार असून, सध्या सीआयडी आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत.
सीआयडीकडून केज, मस्साजोग, परळीतही पाहणी
संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला. यानंतर बीड जिल्ह्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी पथकामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करावी, असे जाणवत आहे त्या-त्या ठिकाणी हे पथक रवाना होत आहे. सीआयडीचे पथक बीड जिल्ह्यामध्येच असून, या पथकातील अधिकाऱ्यांकडून मागील दोन दिवसांत केज, मस्साजोग आणि परळी या ठिकाणी जाऊन आल्याचेही बोलले जात आहे.
वाल्मिक कराडला अटक कधी?
मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी वाल्मिक कराडावर संशय व्यक्त केला आहे. खरं तर पोलिसांनी वाल्मीक कराडवर केवळ खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण विरोधकांनी खून प्रकरणात वाल्मिक कराडकडे अंगुलीनिर्देश करत अटक का होत नाही? असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.
चार दिवसांपासून पथक बीडमध्येच
मागील चार दिवसांपासून सीआयडीचे पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून, सीआयडीचे विशेष पथक बीड शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहे. या माहितीच्या आधारे सीआयडीचा सध्या तपास सुरू आहे.