राज्यभरात पावसाचे थैमान; मुंबई, नांदेडमध्ये घराची भिंत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू (फोटो- istockphoto)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच काही ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईसह नांदेडमध्ये पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. घराची भिंत कोसळून चौघांचा मृत्यू झाला. विक्रोळी पार्कसाईट शालू मिश्रा (वय १९ वर्षे), सुरेश मिश्रा (५० वर्षे) व नांदेडमधील शेख नासेर शेख आमीन आणि त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर अशी मृतांची नावे आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस या भागात वरुणराजा धो-धो बरसताना दिसेल. मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईत कालपासूनच पावसाची रिमझिम सुरु असून अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.
दरम्यान, मुंबई आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची आज शक्यता आहे. पालघर आणि ठाण्यालादेखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जर काही काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच थांबा. असं आवाहन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात सर्वत्र तूफान पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील मांजरा, रेणा आणि तेरणा या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे देखील वाहणार आहे.
नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती
पाऊस हवामान विभागाकडून रायगड, कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह तूफान कोसळण्याची शक्यता आहे.
अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं
नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असे आवाहन करण्यात आले आहे. तर पालघर, जालना, सिंधुदुर्ग, नाशिक, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.