
पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा
सोलापूर : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्र आता भारतीय जनता पक्षाचा भक्कम बालेकिल्ला बनला आहे, असा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या चारही जिल्ह्यांत भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, आगामी काळात विविध पक्षांतील अनेक नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा गोरे यांनी केला. कळंब नगरपालिकेतील नगरसेवकांच्या पक्षप्रवेशातून त्याची झलक दिसल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, खासदार, जिल्हा संघटनात्मक पदाधिकारी आणि मतदारसंघ प्रमुखांची बैठक झाली. आगामी निवडणुकांची तयारी, पक्ष संघटना मजबूत करणे आणि मतदार नोंदणी मोहिमेला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
मतदार यादीच्या पुनरीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघात सक्रियपणे काम करावे. भाजपच्या विचारांशी जोडले जाणारे अधिकाधिक मतदार नोंदविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकांसाठीही भाजपने तयारी सुरू केली आहे. मतदार नोंदणीपासून संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करण्यापर्यंतची रणनीती आखली जात असून, भाजप समर्थित उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.
यावेळी जयकुमार गोरे, पालकमंत्री म्हणाले, “महायुती म्हणूनच एकत्र निवडणूक लढविण्याला आमचे प्रथम प्राधान्य आहे. ज्या पक्षाला जागा मिळेल, त्या ठिकाणी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे ताकदीने निवडणूक लढवतील.”
आगामी निवडणुकांतील जागावाटपाचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांच्या स्वतंत्र समितीकडून घेतला जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळते, यापेक्षा महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकदिलाने काम करणे महत्त्वाचे असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.