तळवडे आयटी पार्कजवळ दोघांची हत्या (File Photo : Crime)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरु असलेले खुनाचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी वाडी ठाण्यांतर्गत पुन्हा एक खुनाची घटना पुढे आली आहे. दारूचा ग्लास खाली पडून फुटल्याच्या कारणातून एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यात त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सूरज सुभाष भलावी (वय 27, रा. सोनबानगर, वाडी) असे मृताचे नाव आहे. सूरज हा गेल्या काही दिवसांपासून दारूभट्टीत येऊन दादागिरी करत कर्मचाऱ्यांना त्रास देत होता. पोलिसांनी सूरजचा भाऊ सौरभच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून 9 जणांना अटक केली आहे. संदीप श्रीहरी चव्हाण (वय 35, रा. सोनबानगर), प्रभाकर अंबादास चिंतामणी (वय 49, रा. शिवाजीनगर झोपडपट्टी, वाडी), रोहित सुखदेव वरखडे (34) रा. चंद्रमणीनगर, बाबुलखेडा, हरीश दयाराम बानिया (56) रा. दिव्यनगरी, मानकापूर, विशाल दिवेकर (45) रा. न्यू कैलाशनगर, अजनी, पियूष दिवेकर (40), सुनील गोटे रा. भगवाननगर, गोपाल जयस्वाल रा. बेसा आणि कुणाल मेंढे (45) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध दरोड्याची तयारी, घरफोडी आणि आर्म्स अॅक्टसह 3 गुन्हे नोंद आहेत. तो नेहमी खडगाव मार्गावरील सायरेच्या देशी दारूच्या अड्ड्यावर जात होता. मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो भट्टीत गेला. दारू पिल्यानंतर त्याने काचेचा ग्लास फोडला. यामुळे भट्टीचा व्यवस्थापक व इतर आरोपी नाराज झाले. त्यांनी फटकारले असता सूरजने त्यांना शिवीगाळ सुरू केली. कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करत जमिनीवर पाडले.
बेशुद्धावस्थेत झुडपात फेकले
आरोपी त्याला उचलून बाहेर घेऊन गेले आणि जवळच असलेल्या नालीच्या झुडूपात फेकले. बराच वेळपर्यंत सूरज तेथेच जखमी अवस्थेत पडून होता. दरम्यान, तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सूरज जखमी अवस्थेत झुडूपात पडून असल्याची माहिती मिळताच सौरभ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. बुधवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.