‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ने ‘इलू इलू’च्या दिग्दर्शकाचं केलं कौतुक; म्हणाला, ‘फाळके नावातच स्पार्क...’
फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा बॉलीवूड स्टार आमिर खान यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.
‘फाळके या नावातच एक स्पार्क आहे. अतिशय सुंदर चित्रपट अजिंक्य फाळके यांनी केला असल्याचे आमीर खान यांनी यावेळी सांगितले’. चित्रपटाची निर्मीती आणि अजिंक्य फाळके यांच्या दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती आमिर खान यांनी यावेळी दिली. उत्तम कथा असल्यास एखादा मराठी चित्रपट करायला नक्कीच आवडेल असं आमिर खानने याप्रसंगी आवर्जून सांगितलं. आमिर खान सरांचं मार्गदर्शन या चित्रपटासाठी लाcभलं ते आमच्यासाठी मोलाचं होतं. त्यांची ही कौतुकाची थाप आमचा हुरूप वाढवणारी असल्याचं दिग्दर्शक अजिंक्य फाळके याने यावेळी सांगितलं.
Hera Pheri 3: प्रियदर्शन ‘हेरा फेरी ३’ करण्यासाठी सज्ज; राजू, श्याम आणि बाबुराव पुन्हा दिसणार एकत्र!
‘इलू इलू’ या चित्रपटाबाबत तरुण वर्गामध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि संगीताने याआधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटात बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम सोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर,वनिता खरात, मीरा जगन्नाथ, आनंद कारेकर, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, निशांत भावसार, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.