फोटो सौजन्य - Social Media
निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आदिनाथ कोठारे नुकताच लालबागच्या राजाच्या चरणी हजेरी लावली. गणरायाच्या दर्शनाने भारावून गेलेला आदिनाथने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना या खास क्षणाची झलक दाखवली. “कालच्या नशीबवान दर्शनाची झलक” असे कॅप्शन देत त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो तल्लीन होऊन बाप्पाच्या आराधनेत मग्न झाल्याचे दिसून येते.
आदिनाथ कोठारे हा अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा तिन्ही क्षेत्रांत सक्रिय असून आपल्या प्रत्येक कामात तो प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवे देतो. सध्या तो “नशीबवान” या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून ही मालिका त्याच्यासाठी विशेष ठरणार आहे. कारण मालिकेची निर्मिती स्वतः करून, त्यात मुख्य अभिनेता म्हणून देखील काम करण्याची संधी त्याला मिळत आहे. त्यामुळे ही भूमिका आणि ही मालिका आदिनाथसाठी आयुष्यातील एक मोठा टप्पा ठरत आहे.
रामायण, झपाटलेला ३, नशीबवान यांसारख्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केल्यानंतर आता तो बॉलिवूडच्या बड्या प्रोजेक्ट्सकडेही वाटचाल करत आहे. “गांधी”, “रामायण” आणि अनेक बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटांत तो दिग्गज कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे. या संधी त्याच्यासाठी मोठं भाग्य घेऊन आल्याचं तो स्वतः सांगतो.
आपल्या कारकिर्दीच्या या नव्या पर्वात आदिनाथला बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे कामातल्या या यशस्वी टप्प्यावर त्याने स्वतःला खरोखरच “नशीबवान” मानलं आहे. आगामी काळात तो मराठी आणि हिंदी या दोन्ही क्षेत्रांत विविधांगी प्रोजेक्ट्सद्वारे प्रेक्षकांना नक्कीच नवे अनुभव देणार आहे, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांची आहे.
मालिका विश्वात आदिनाथचं पदार्पण!
चित्रपट, वेब शो आणि आता मालिका! अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारा आदिनाथ कोठारे छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. आतापर्यंत रुपेरी पडद्यावर दमदार प्रोजेक्ट्स, उल्लेखनीय भूमिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रभावी कामगिरी करून त्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता पहिल्यांदाच आदिनाथ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असून, त्याचा हा नवा प्रवास चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे.