जालियनवाला बाग हत्याकांडवर येणार चित्रपट, बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट दिसणार मुख्य भूमिकेत
बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सत्य घटनेवर आधारित सिनेमे पाहायला मिळत आहे. ‘इमरजन्सी’, ‘द साबरमती रिपोर्ट’ सारखे वेगवेगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. आता अशातच आणखी एका सत्य घटनेवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे हे तिनही स्टार एकत्र दिसणार आहेत. धर्मा प्रॉडक्शनकडून या सिनेमाची घोषणा करण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा – रील ते रिअल, विद्या बालनची अनोखी ड्रेसिंग स्टाईल
करण सिंग त्यागी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांकडून आजच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या प्रॉडक्शन हाऊसकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. “आजवर कधीही न सांगितलेली कहाणी. आजवर कधीही न सांगितलेलं सत्य.” असं कॅप्शन देऊन या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. १४ मार्च २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
जालियनवाला बागेत ब्रिटीशांनी केलेल्या हल्ल्यावर आधारित सिनेमाचं कथानक आहे. घटनेवेळी भारतातील सी. शंकरन नायर यांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात केलेली कायदेशीर लढाई सिनेमात दिसणार आहे. रघु पलट आणि पुष्पा पलट लिखित ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारीत असणार आहे. जालियनवाला बाग हत्याकांडच्या वेळी पंजाबमधील लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओ’डायर यांच्या कार्यकारी परिषदेने त्यांचे माजी सदस्य चेत्तूर शंकरन नायर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. जालियनवाला हत्याकांडानंतर शंकरन नायर यांनी राजीनामा दिला होता. या सिनेमात कोर्टरुम ड्रामा दिसणार असून अक्षय कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ सिनेमा रिलीज, किरण मानेची बिग बॉस विजेत्यासाठी खास पोस्ट