सौजन्य- सोशल मीडिया
बिग बॉसचा पाचवा सीझन कमालीचा रंगात आला आहे. बिग बॉस सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत. बिग बॉसच्या घरात सर्वाधिक वाद घालणाऱ्या स्पर्धकांच्या यादीमध्ये अभिनेत्री निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरची जोरदार चर्चा सुरू आहे. पण असं असलं तरीही जान्हवी किल्लेकरने या आठवड्यात अनेक स्पर्धकांसोबत तुफान राडा घालत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधलेय. या आठवड्यात तिने पंढरीनाथ कांबळेसोबत जोरदार राडा घातला होता. अभिनेत्याला त्याच्या अभिनयावरून बोलल्यामुळे सोशल मीडियावरून जान्हवीला फक्त चाहत्यांनीच नाही तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही तिला ट्रोल केलं.
गेल्या आठवड्यात झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेशने जान्हवीला तिच्या वागण्यावरून तिला चांगलंच सुनावलं होतं. पण आता पुन्हा एकदा चौथ्या आठवड्यातही रितेश देशमुख जान्हवीची कानउघडणी करताना दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘भाऊच्या धक्का’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश जान्हवीला म्हणाला की, “भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही.” तिच्या वागण्यावरून रितेश बिग बॉसच्या घरातून तिला बाहेर काढणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रोमोध्ये रितेश जान्हवीला म्हणतो, जान्हवी तुम्ही बिग बॉसच्या घरातल्या इतिहासातल्या सर्व स्पर्धकांमधील सर्वात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही नेहमी सर्वांना म्हणतात ना, ए मी तुला बाहेर काढेल, वैगेर.. आज मी तुमची दादागिरी आणि माज आता सर्व इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढतोय, दरवाजा उघडा… प्रोमोमध्ये रितेश जान्हवीला ओरडत असताना, ती रडत होती. आजच्या एपिसोडमध्ये जान्हवी खरंच घराच्या बाहेर येणार का ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
यंदाच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामध्ये, रॅपर आर्या जाधव, अभिजीत सावंत, इरिना रुडाकोवा आणि वैभव चव्हाणचा समावेश आहे. या चौघांपैकी कोणता एक स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार की जान्हवी किल्लेकरला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागणार याचं उत्तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहे.