(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मूळतः एप्रिलच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला आहे. पटकथेत काही बदल केल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, या विलंबामागील एक प्रमुख कारण म्हणजे अभिनेते-गायक प्रशांत तामांगचे आकस्मिक निधन.
चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘इंडियन आयडॉल ३’ चा विजेता प्रशांत, ‘मातृभूमी’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडला गेला होता. त्याने अनेक महत्त्वपूर्ण दृश्यांचे चित्रीकरण आधीच केले होते, परंतु अजून बरीच दृश्ये चित्रित करायची बाकी होती. चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच जानेवारी महिन्यात प्रशांतचे निधन झाले. टीमने दोन शेड्यूलचे नियोजन केले होते, ज्यात प्रशांत काही महत्त्वपूर्ण दृश्यांचे चित्रीकरण करणार होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण टीम गोंधळात पडली आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी सुरुवातीला त्याची दृश्ये पुन्हा चित्रित करण्याचा विचार केला होता, परंतु ते शक्य दिसत नाही. क्लोज-अप शॉट्स शक्य असले तरी, तो एका मोठ्या ॲक्शन सीक्वेन्सचाही भाग होता. प्रशांतची अनुपस्थिती निर्मात्यांना महागात पडत आहे.
याव्यतिरिक्त, सलमान खानच्या तारखा आणि त्याच्या लूकमधील सातत्य यामुळेही अडचणी निर्माण होत आहेत. एके वेळी, टीमने प्रशांतच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेण्याचा किंवा उर्वरित दृश्यांमध्ये प्रशांतचा चेहरा सुपरइम्पोज करण्यासाठी एआय (AI) आणि व्हीएफएक्स (VFX) वापरण्याचा विचार केला होता, परंतु यासाठी त्याच्या कुटुंबाची परवानगी आवश्यक होती. चित्रपट लवकर पूर्ण करायचा असल्याने आणि पोस्ट-प्रॉडक्शन सुरू होणार असल्याने, निर्माते या महिन्याच्या अखेरपर्यंत गोष्टी निश्चित करतील. प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु चित्रपटाची संकल्पना पाहता, तो स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होऊ शकतो.
‘मातृभूमी’चे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंगने एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्रशांतचे निधन झाले. ते फक्त ४३ वर्षांचे होते.






