(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ब्रेकिंग न्यूजचा पाठपुरावा केल्यामुळे तुमचा जीवच धोक्यात येत असेल तर काय होईल? ZEE5चा बहुप्रतीक्षीत क्राइम थ्रिलर सिनेमा डिस्पॅच या प्रश्नाचं उत्तर थरारक पद्धतीनं देण्यासाठी सज्ज आहे. प्रतिष्ठित मामी फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पर्दापण आणि त्यानंतर 55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) झालेल्या स्क्रीनिंगनंतर डिस्पॅच सिनेमा ZEE5 वर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट 13 डिसेंबरला पाहाता येणार आहे. रॉनी स्क्रुवाला यांच्या आरएसव्हीपी मूव्हीजची निर्मिती आणि तितली अँड आग्रा फेम प्रसिद्ध दिग्दर्शक कनू बदल यांचं दिग्दर्शन असलेल्या डिस्पॅच सिनेमात मनोज वाजपेयी जॉय बॅग या गुन्हेगारी क्षेत्राचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका धोकादायक प्रकरणाची माहिती काढत असल्यामुळे जॉय यांचा जीव धोक्यात येतो. या सिनेमात शहाना गोस्वामी, अर्चिता अगरवाल, रितू पर्ण सेन, दिलीप शंकर, रिजू बजाज आणि इतर कलाकारही दिसणार आहेत.
या सिनेमाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर समाजातील गुन्हेगारी उघडकीस आणण्याच्या पत्रकाराच्या धाडसी प्रवासाची झलक दाखवतो. गुन्हेगारी पत्रकार जॉय बॅग एका भयंकर घोटाळ्यामागचं सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा जीव नकळतपणे धोक्यात येतो. हा तपास सोडून देण्यासाठी अज्ञात शत्रुकडून येणाऱ्या धमक्यांमुळे जॉय यांची ब्रेकिंग स्टोरी आणखीनच धोकादायक बनते. मात्र, तपास पुढे जातो तसं जॉय त्यांच्या अपेक्षेपलीकडे भयानक वादळात अडकतात. आणि या चित्रपटाची कथा आणखी रंजक होऊन जाते.
दिग्दर्शक कनू बहल या चित्रपटाबद्दल बोलतानाम्हणाल्या की, ‘मी 2016 मध्ये डिस्पॅचवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर केलेल्या सखोल संशोधनानंतर आम्हाला पत्रकारितेच्या विश्वातल्या कित्येक आश्चर्यकारक गोष्टी समजल्या, विशेषतः मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात काम करणाऱ्या पत्रकारांच्या गोष्टी आणखीनच थरारक होतात. फक्त थ्रिलर सिनेमा काढायचं आमचं ध्येय नव्हतं, तर अशाप्रकारच्या वार्तांकनातली मानवी बाजू समोर आणण्याचं आणि ठळक बातम्यांपलीकडचं प्रखर सत्य आम्हाला सर्वांसमोर आणायचं होतं. पटकथा तयार झाल्यानंतर त्यातील जॉय बॅगची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी केवळ मनोज वाजपेयी यांचं नाव आमच्यासमोर होतं आणि त्यांनी या सिनेमात जबरदस्त काम केलं आहे. सिनेमात शहाना गोस्वामी आणि अर्चिता अगरवाल यांसारखे असामान्य कलाकारही काम करत आहे. मी ठामपणे सांगू शकतो, की डिस्पॅच हा अनोखा अनुभव आहे आणि प्रेक्षकांनी तो घ्यावा यासाठी मी उत्सुक आहे.’ असे त्यांनी सांगितले.
अभिनेते मनोज वाजपेयी या सिनेमाबाबत म्हणाले, ‘मामी, इफ्फी आणि जेएफएफसारख्या विविध महोत्सवांनंतर डिस्पॅच हा सिनेमा ZEE5 वर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी ZEE5 शी संबंधित आहे आणि डायल 100, सायलेन्स आणि सिर्फ एक बंदा काफी है या सिनेमांच्या यशानंतर आणखी एक गुंतवून ठेवणारा सिनेमा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री वाटते. या भूमिकेसाठी सखोल तयारी करण्यावर माझा भर होता आणि कनूने एखाद्या कडक शिक्षकाप्रमाणे आमच्याकडून चौकटीबाहेरचे आणि सर्वोत्तम काम करून घेतले आहे. आम्हाला आशा आहे, की हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकेल आणि आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल.’ असे अभिनेत्याने सांगितले.