छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची व्याख्या; म्हणाल्या, "दीपिका, आलिया सारखं दिसण्याचा प्रयत्न करेन, पण..."
‘फँड्री’, ‘सैराट’, ‘रेडू’, ‘न्यूड’, ‘झुंड’ आणि ‘गंगुबाई काठियावाड’ सारख्या अनेक हिट चित्रपटांतून अभिनेत्री छाया कदम ह्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून छाया यांच्या अभिनयाची कौतुक फक्त महाराष्ट्रातच किंवा देशात होत नाहीये अख्ख्या जगभरात होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ या सिनेमाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग झालं या चित्रपटासाठी त्यांना स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं. अशातच सध्या छाया कदम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी एका मुलाखतीत इंडस्ट्रीतल्या सौंदर्याच्या स्पर्धेबद्दल वक्तव्य केलं आहे.
‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ आणि ‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमामुळे प्रकाशझोतात राहिलेल्या अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली. ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनलला छाया कदम यांनी मुलाखत दिली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा यायचं ठरवलं त्यावेळी आपलं दिसणं हे इतरांसारखं नाहीये, साचेबद्ध नाही, याची जाणीव झाली का? आणि जेव्हा झाली तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत कसं जुळवून घेतलं? असा प्रश्न छाया यांना विचारण्यात आला होता…. अभिनेत्री म्हणाली की, “कलाकार जेव्हा तुम्हाला कोणत्याही कलाकृतींमध्ये दिसतो ना त्यावेळी तुम्हाला वाटतं की याची फिल्मी करियर आत्ताच सुरु झालं आहे. पण तसं नसतं. त्याचा तो आधीचा प्रवास आहे ना तो फार मोठा असतो. जसं मी २००१ मध्ये प्रा. वामनराव केंद्रे यांचं एक वर्कशॉप केलं होतं. तेव्हापासून माझी अभिनयामध्ये काम मिळवण्याची धडपड सुरूच होती.”
“पण, त्यावेळी काम मिळवणंही फार कठीण होतं. आत्ताचा हा सोशल मीडियाचा जमाना आहे. आत्ता आपण आपलं काम सहज लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्यावेळी तसं नव्हतं, काम मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागायची. माझं काम मिळवण्याचा तो प्रवास ती धडपड २००१ पासूनच सुरू होती. तेव्हापासून ते २००५ पर्यंत लोकांना माझी ओळख पटवून देण्यासाठी ते पाच वर्ष गेली. माझं पहिलं नाटक ‘झुलवा’ होतं. त्यावेळी कलाकारांबद्दल जास्त लूक्स मॅटर केले जात नव्हते. नाटकामध्ये जेवढे कलाकार होते ना आम्ही सर्वच सारखे दिसायचो, अगदी गावातल्या माणसांप्रमाणेच. वामनराव केंद्रे सरांनी आमच्यातल्या सर्वच कलाकारांचा रंग पाहिला नाही, पण त्यांनी आमच्यातले गुण पाहिले, टॅलेंट पाहिले. मला अनेकदा वाटतं की, आपणही गोरं दिसावं. पण माझ्यात जे गुण आहेत ना तेच अनेकांना भावतात.”
हेदेखील वाचा- दीपिकाने आई झाल्यानंतर घेतलं नवीन घर, घराची किंमत…
“माझ्या जवळचे एक दिग्दर्शक होते, ते मला कायम सांगायचे, छाया तू जशी आहेस, तशीच राहा. तुझ्या या लूक्समधूनच तुझे खरे वैशिष्ट्ये दिसत आहेत. सगळ्याच बारीक हिरोईन उभ्या केल्या तर, सर्वच सारख्याच दिसतील. असं त्याचं मत असायचं. त्यामुळे मी जरीही सावळी असली, तरीही तो माझ्यातला प्लस पॉईंटच आहे. प्रत्येकानं स्वत:वर प्रेम करायला शिकायला हवं. ती कशी आहे, तो कसा आहे, याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मी जशी आहे तशी भारी आहे, याच्यात समाधान मिळवा. आपल्याला स्वत:वर प्रेम करता आलं, हे महत्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीने आपल्याला जगातील सुंदर स्त्री असं म्हटलं पाहिजे. मी आजवर ज्यांच्याबरोबर काम केलंय, त्यांचा सहवास मला खूप चांगला मिळाला आहे. जर मला ग्लॅमरस दिसणारी भूमिका मिळाली तर, तेव्हा मी वेगळा विचार करेल. मग मी वर्कआऊट करून दीपिका आणि आलिया सारखं दिसण्याचा प्रयत्न करेल. पण इतर वेळी मी या गोष्टींना महत्व देणार नाही.” असं अभिनेत्री मुलाखती दरम्यान मिळाली.