कंगना रणौतच्या Emergency च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी CM देवेंद्र फडणवीसांची हजेरी
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. येत्या १७ जानेवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा ‘इमर्जन्सी’चित्रपट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला आहे. मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रियाही दिलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबद्दल सांगितले की, “‘इमर्जन्सी’ चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग होती. याला मी उपस्थिती लावली होती. आणीबाणीच्या काळात भारत देशामध्ये जो काही काळा इतिहास घडला, तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनातील अनेक चांगल्या घटनाही चित्रपटात मांडलेल्या आहेत. चित्रपटामध्ये कंगना रणौत यांनी इंदिरा गांधी यांचं पात्र अगदी प्रभावीपणे साकारलं आहे, मांडलं आहे. या देशाच्या इतिहासात आणीबाणी एक असा काळा अध्याय होता, जो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आलं आणि सामान्य नागरिकांचं मौलिक अधिकार हे संपवण्यात आले.”
मोठी बातमी! सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्याची ओळख पटली; CCTV फुटेज आलं समोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाबद्दल पुढे सांगितले की, “त्या काळातले अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरील चित्रण तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. १९७१ साली ज्या दृढतेनं भारताने बांग्लादेश निर्माण केला, ती दृढताही तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. मला असं वाटतं की, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक ऐतिहासिक घटनांचा मागोवा पाहायला मिळणार आहे. शिवाय, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही प्रवास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल. अभिनेत्री कंगना रणौत यांनी चित्रपटात स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पात्र खूप उत्तम रित्या साकारलं आहे.”
Saif Ali Khan वर हल्ला करणाऱ्या पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, काय माहिती समोर?
चित्रपटात कंगना रणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, पुपुल जयकर आणि दिवंगत सतीश कौशिक या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.‘इमर्जन्सी’चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन ‘बीकेसी’तील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना रणौत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती कंगना रणौतने केले आहे. कंगनाचा हा चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होणार होता. पण, तो वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर काही सीन्स कट केल्यानंतर चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे.