फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूडची सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खानची आई मेनका इराणी यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. जुलैच्या २६ तारखेला त्यांची देवाज्ञा झाली आहे. त्यांच्या निधनाने खान कुटुंबासह सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराची प्रक्रिया पार पडली पण त्यांच्या स्थितीत काही सुधार दिसत नव्हता. शेवटी, त्यांना देवाज्ञा स्वीकारावी लागली. मेनका इराणी ७९ वर्षाच्या होत्या.
काही दिवसांपूर्वी आई रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती फराहने एका ब्लॉगमार्फत दिली होती. या ब्लॉगमार्फत तिने तिच्या आईची ओळख तिच्या चाहत्यांशी घडवली होती. तसे मेनका इराणींना ओळख करून देण्याची जास्त गरज नाही. त्या फराह खान आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानची आई असून निर्माते कामरान खान यांच्या पत्नी आहेत.
या दुःखाच्या क्षणी फराह आणि साजिदचे सांत्वन करण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार फराहच्या घरी पोहचले होते. अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेते संजय कपूर तसेच टी सिरीजचे एमडी भूषण कुमार यावेळी उपस्थित दिसले. त्याचबरोबर शिव ठाकरेदेखील सांत्वनाप्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित होता.
१२ जुलैला मेनका इराणी यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी फराहने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने आईला शुभेच्छा देत तिच्या आरोग्यासाठी दुआ केली होती. आईसोबतचे फोटो शेअर करताना फराहने कॅप्शनमध्ये लिहले होते कि, ‘आपण सर्व आईला सदैव हलक्यात घेत असतो… विशेषतः मी! माझी आईवर माझे किती प्रेम आहे हे गेल्या महिन्यात मला जाणवले.. मी पाहिलेली ती सर्वात बलवान, धाडसी व्यक्ती आहे.. अनेक शस्त्रक्रियांनंतरही तिची विनोदबुद्धी कायम आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. घरी परतण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तू पुन्हा माझ्याशी वाद करायला तयार होण्याची मी वाट पाहू शकत नाही… आय लव्ह यु!”