सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, तिरंग्यांची पताका आणि देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरणात दुर्दैवी घटना घडली आहे. बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात आणि त्यांच्या कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवार (दि. १५) रोजी दुपारी सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये दत्ता होलारे, लखन धावरे (दोघे रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) यांचा समावेश आहे.
मात्र, तोपर्यंत उशीर झाला
पोलिसांच्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील हे तिन्ही कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे सकाळी कामाला गेले होते. चेंबरमध्ये उतरल्यावर हवाबंद जागेत गुदमरल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
कष्टकऱ्याची ऊब कायमची निघून गेली
घराबाहेर कामाला गेलेल्या आपल्या माणसांच्या परतीची वाट पाहणाऱ्या कुटुंबांना दुपारी त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच, सर्वत्र शोककळा पसरली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हरवली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची निघून गेली.
कोणताही कर्मचारी कार्यरत नव्हते
दरम्यान, या प्रकरणावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, सदर इन्स्पेक्शन चेंबर हे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अखत्यारीतील नाही आणि या कामात महापालिका किंवा ड्रेनेज विभागातील कोणताही कर्मचारी कार्यरत नव्हता.
हे सुद्धा वाचा : दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न; मुलाने छातीत चाकू भोसकला अन्…
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात
पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात एक विचीत्र अपघात घडला आहे. मैत्रिणीला घेऊन दुचाकीने निघालेल्या तरुणाला पाठिमागून आलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये तो तरुण आणि त्याची मैत्रिण खाली कोसळले. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तो तरुण सापडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवम सिंग (वय २२, रा. एअरफोर्स स्टेशन, विमाननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारासह टेम्पोचालक इंद्रजीत संजय नरोटे (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवम सिंग याची बहीण नेहा (वय २०) हिने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.