फोटो सौजन्य - Social Media
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट ‘नाळ 2’ ला विशेष दाद मिळाली. या चित्रपटातील तीन बालकलाकार – त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या तिघांपैकी अवघ्या 6 वर्षांची त्रिशा ठोसरनं मात्र एक ऐतिहासिक विक्रम मोडला आहे.
त्रिशानं मिळवलेला राष्ट्रीय पुरस्कार केवळ तिच्या वयामुळेच चर्चेत नाही, तर त्यामागे एक विशेष कारण आहे. तिनं दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा तब्बल 65 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. कमल हासन यांना वयाच्या सहाव्या वर्षी ‘कलाथुर कन्नम्मा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता त्रिशानं तोच पराक्रम गाठून मराठी चित्रपटसृष्टीचं नाव उज्ज्वल केलं आहे.
पुरस्कार सोहळ्यात त्रिशा साडी नेसून पोहोचली होती. तिच्या निरागस चेहऱ्याने, गोड हसण्याने आणि सहज वावराने ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे, स्वतः कमल हासन यांनी व्हिडिओ कॉल करून त्रिशाशी संवाद साधला. त्यांनी तिच्या कामगिरीचं कौतुक करत पुढील चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या. “टचमध्ये राहा,” असा सल्लाही त्यांनी दिला. इतकंच नव्हे तर त्रिशाच्या आईशी बोलून तिला योग्य ट्रेनिंग व मदतीचं आश्वासन दिलं.
त्रिशानं या वर्षी महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कारही पटकावला आहे. एका वर्षात राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं हे तिच्यासारख्या लहानग्या बालकलाकारासाठी दुर्मिळ यश ठरलं आहे. ‘नाळ 2’ मधल्या प्रभावी अभिनयामुळे देशभरात लक्ष वेधून घेणारी त्रिशा ठोसर आज घराघरात चर्चेचा विषय ठरली आहे. मराठी सिनेमाला नवा गौरव मिळवून देणाऱ्या या लहानग्या अभिनेत्रीबद्दल सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अभिनेता कमल हसन यांनी त्रिशाचे कौतुक करताना तिला कोणत्या मूव्हीमध्ये आता काम करत आहेस असे विचारले असता तिने महेश मांजरेकरांसोबत काम करत असल्याचे सांगितले आहे. कमल हसनने महेश मांजरेकरांचेही कौतुक केले आहे, तसेच तिला आशीर्वाद देत आहे. तिच्या आईला त्रिशासाठी काहीही मदत लागली तर आम्ही करू असे आश्वासन दिले आहे.