सातारा : किरण माने (Kiran Mane) यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तीनवेळा वाॅर्निंग देऊन मग सीरीयलमधून काढण्यात आले. परंतु, त्यांनी त्याचा राजकीय स्टंट केल्याचा आरोप ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाणे (Sachin Sasane) यांनी केला आहे.
किरण माने यांच्या स्टंटमुळे गावातील आणि जिल्ह्यातील शुटींगसाठीचे वातावरण गढूळ झाले आहे. शुटींगमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. असे असताना कित्येकांच्या पोटावर पाय आणण्यासाठी किंवा आपल्याकडे शुटींगच येऊ नयेत, अशा पध्दतीने राजकीय पोस्ट करुन दबाव निर्माण केला आहे. पण यात काही तथ्य नाही. चुकीच्या धोरणामुळे किरण माने यांना तीनवेळा वाॅर्निंग देऊन मग त्यांना काढले आहे, असा खुलासा सचिन ससाणे यांनी केला आहे.
सोशल मीडियावर राजकीय पोस्ट केल्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला. हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. वाई तालुक्यातील गुळुंब ग्रामपंचायती अंतर्गत मयुरेश्वर गावात या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. गुळुंब गावच्या सरपंचांनी चित्रीकरणाची परवानगी रद्द केल्याचे पत्र व्हायरल केले असले तरी आज या मालिकेचे चित्रीकरण सुरु होते.
सरपंचांचे पत्र
गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी किरण माने प्रकरणात एक पत्र व्हायरल करत उडी घेतली आहे. या पत्रात त्या म्हणतात, राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहिर निषेध. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वहिनी व मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरू नये. अजूनही महाराष्ट्रात शिव, शंभू शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते. अशा मनूवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वहिनी व मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही, असे या पत्रात नमूद केले आहे.
गुळुंब गावच्या सरपंचांचे चित्रीकरणाला मान्यता रद्द असे सांगणारे पत्र व्हायरल झाले असले तरी त्यांचा मोबाईल फोन काल रात्रीपासून बंद आहे. त्यांच्या गावीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. गावात ग्रामपंचायतीचा कोणीही पदाधिकारी या प्रकरणावर बोलायला तयार नाही.