गावाच्या मध्यभागी देवी तुळजाभवानी आपल्या दिव्य सिंहासनावर विराजमान झाली आहे. देवीच्या आगमनाने संपूर्ण गाव भक्तीत न्हाऊन निघाले आहे. देवीच्या समोर आराधी लोक आपला पारंपारिक पोत नाचवत जल्लोष करत आहेत, तर वयस्कर स्त्रिया डोक्यावर ‘परडी’ घेऊन भान हरपून नृत्य करत आहेत. या भावूक प्रसंगी कदम बाबा आणि पाटील देवीसमोर हात जोडून उभे राहतात. डोळ्यांत आनंदाश्रू आणून कदम बाबा मोठी घोषणा करतात.
“आई, आजपासून हे गाव तुझ्या नावाने ओळखलं जाणार. हे चिंचपूर नाही, तर आजपासून हे आई तुळजाभवानीचं ‘तुळजापूर’!”
हे नाव ऐकताच संपूर्ण आसमंत ‘तुळजाभवानीच्या’ जयघोषाने दुमदुमून जातो. त्याच क्षणी देवीच्या त्रिशूळातून विजेची एक लखलखती शलाका आकाशात झेपावते, ढगांचा गडगडाट होतो आणि देवीचा मुकुट सुवर्ण प्रकाशाने उजळून निघतो.
त्या नंतर देवीचा भक्तांशी संवाद आणि उलगडणारा मायेचा भावबंध प्रेक्षकांना अनोख्या कथेची अनुभूती देणार आहे.
महिषासुराचे भयानक कारस्थान: ‘महिषासूरपूर’चा डाव?
एकीकडे तुळजापुरात आनंदाचे भरते आले असताना, दुसरीकडे महिषासुराच्या दालनात संताप आणि सूडाचा अग्नी धगधगत आहे. देवीच्या वाढत्या शक्तीने महिषासुर प्रचंड रागात आहे. तो गर्जना करतो की, “तुळजापूर लवकरच महिषासूरपूर बनणार!”
आपल्या काळ्या शक्तीचा वापर करत तो हवेत हात फिरवतो आणि त्याच्यासमोर जांभळ्या प्रकाशात एक मोठी झाकलेली थाळी प्रकट होते. या थाळीत असे कोणते रहस्य लपले आहे, ज्याच्या जोरावर महिषासुर देवीला आव्हान देणार? हे पाहणे आता अत्यंत थरारक ठरणार आहे.
महिषासुराचे षडरिपू काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर या रिपूंनी हार पत्करुन देवी तुळजाईच्या पायाशी शरण गेले. त्यामुळे प्रत्येक वेळा असूरांनी प्रत्येक वेळेला केलेलं कट कारस्थान तुळजाईने हाणून पाडलं. आता वेळ जवळ आलीये महिषासुराच्या वधाच्या. महिषाच्या पापांचा घडा भरत आला असून देवीच्या अष्टभूजा रौद्ररुपासमोर महिषासूर हादरुन जाणार आहे. या होणाऱ्या महायुद्धाची नांदी ही भक्ती, शक्ती आणि संघर्षाचा हा अद्भूत सोहळा कलर्स मराठीच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे हे नक्की.






