आगामी भागात स्वामी समर्थ जमिनीवर झोपण्याचा निर्णय घेतात, भक्तांच्या यादी तयार करतात आणि अचानक प्रकटलेल्या शिवलिंगाशी संवाद साधतात.यामुळे ही कथा गूढ थरारक वळण घेते. सुंदरा, कपिला आणि सेवेकऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होतो. पुण्यातील शिवभक्त नंदराम गवंडी यांची कथा, त्यांचा आजार, स्वामींचा अंगारा आणि पुढे घडणारी स्वामी लीला कथानकाला आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाते. स्वामी मल्लिकार्जुन रूपात दर्शन देतात तर दुसरीकडे स्वामी गोडाधोडाचा त्याग जाहीर करतात. या साऱ्या घडामोडींमधून महानिर्वाणाकडे जाण्याचे गूढ संकेत स्वामी देत आहेत. हा अंतिम टप्यातील म्हणजेच स्वामींच्या महानिर्वाणाचा सुरु झालेला अध्याय मृत्यूबाबतचं सत्य समजावून सांगत आहे.
जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सुरुवातीपासून ते अगदी आता अंतिम टप्प्यापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांची लोकप्रियता टिकवून ठेवली, मालिकेतून स्वामींचे विचार स्वामींनी भक्तांना दिलेली शिकवण यामुळे मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात, अनेकदा आपण नैराश्यात जातो, रागावर नियंत्रण राहत नाही अनेकदा आपल्याही नकळत खूप जणांना दुखावतो त्यावर स्वामी सांगतात की, तुमचे कर्म, मन आणि हेतू स्वच्छ ठेवा. तुमचं चांगलं करण्यासाठी आम्ही आहोत. म्हणूनच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नाही तर ते स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेलं वचन आहे आणि आजही स्वामींच्या जाण्यानंतर देखील त्यांच सत्व त्यांच्य़ा भक्तांना कायम जाणवतं. स्वामी शरीराने नसले तरी त्यांचं अस्तित्व त्यांच्या भक्तांच्या पाठीशी कायमच आहे.






