Manvat Murders (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘सोनी लिव्ह’वरील आगामी मालिका ‘मानवत मर्डर्स’मधील कलाकार मंडळींनी सोमवारी मुंबईतील लालबागमधील गणेशगल्लीच्या सुप्रसिद्ध मुंबईच्या राजाला भेट दिली आणि महाआरतीमध्ये सहभाग घेताना दिसले. बहुप्रतिक्षित अशा या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांनी आपल्या या आगामी प्रकल्पाच्या यशासाठी बाप्पाचे आशिर्वाद घेतले आहे. या मानाच्या सोहळ्याला या नटसंचाची उपस्थिती लाभल्याने मालिकेची मोठ्या उत्सुकतने वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या उत्साहात अधिकच भर पडली आहे.
१९७०च्या दशकामध्ये महाराष्ट्राला हादरवणाऱ्या प्रसिद्ध शोकांतिकाचा मागोवा या मालिकेमधून घेतला जाणार आहे. या मालिकेमध्ये भारताचे शेरलॉक होल्म्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध सीआयडी अधिकारी रमाकांत एस कुलकर्णी यांची आपल्या कामाप्रती अविचल बांधिलकी, चिकाटी आणि गुंतागूंतीची प्रकरणे सोडविण्याचे त्यांचे कौशल्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
हे देखील वाचा- ‘साला मै तो साहब बन गया’; अनुपम खेरने साजरे केले ‘अनुपम खेर डे’चे नऊ वर्ष !
स्टोरीटेलर्स नूक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी निर्मिती केली असून, गिरीश जोशीकृत मानवत मर्डर्सचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले आहे. फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम रमाकांत कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर आधारित या मालिकेमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ४ ऑक्टोबरपासून ‘मानवत मर्डर्स’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.