Neil Nitin Mukesh Was Detained At New York Airport Officials Doubted His Indian Identity
अभिनेता नील नितिन मुकेश (Neil Nitin Mukesh) हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने ‘न्यूयॉर्क’, ‘हिसाब बराबर’, ‘साहो’, ‘शॉर्टकट रोमियो’, ‘प्रेम रतन धन पायो’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा नील नितिन मुकेश सध्या त्याच्या एका किस्स्यामुळे चर्चेत आला आहे. नीलला एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती त्याने मुलाखतीत दिली होती.
रत्नागिरीमध्ये रंगलीय तालुकास्तरीय नाट्यस्पर्धा, गावकऱ्यांना मिळणार अनेक कलाकृतींचा नजराणा
नीलला न्यूयॉर्क विमानतळावर अटक करण्यात आली होती. तिथले अधिकारी अभिनेता भारतीय आहे यावर विश्वास ठेवत नव्हते. त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल चौकशी करण्यात आली होती. त्याने सांगितले की, भारतीय पासपोर्ट असूनही इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तो भारतीय असल्याचे मान्य करण्यास नकार दिला. नील नितीन मुकेशने नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली आहे. २००९ साली नीलचा ‘न्यूयॉर्क’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात नीलसोबत कतरिना कैफ आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातले सर्व कलाकार तेव्हा शूटिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये होते. त्यावेळी नीलने त्याला आलेला अनुभव सांगितला आहे.
मुलाखतीदरम्यान नीलने सांगितले की, “मला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. मी एक भारतीय नागरिक आहे आणि माझ्याकडे त्याचा पासपोर्टही आहे, हे मान्य करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तिथले अधिकारी तयारच नव्हते. त्यांनी मला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी किंवा त्यांना काही उत्तर देण्यासाठीही वेळ दिला नव्हता. सुरुवातीला साध्या पद्धतीने सुरू झालेली चौकशी पुढे तब्बल चार तास ती सुरू राहिली. चौकशी करत असताना मी तब्बल चार तास त्यांच्या नजरकैदेतच होतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला होता, त्यामुळे मला त्यांना माझी खरी ओळख पटवून देता येत नव्हती.”
शेवटी परिस्थिती कशी शांत आली ? असा प्रश्न नीलला विचारण्यात आला होता. तिथल्या परिस्थितीचं वर्णन करताना नीलने सांगितले की, “चार तास त्यांनी मला नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की, ‘तुला या सर्व प्रकरणावर काय म्हणायचे आहे?’ त्यांच्या या प्रश्नावर मी त्यांना एकच उत्तर दिलं की, ‘मला तुम्ही गूगल करून पाहा.’ ”
“त्यांनी माझ्याबद्दलची माहिती गूगलवर पाहिल्यानंतर त्यांची माझ्यासोबतची बोलण्याची पद्धत आणि लहेजा बदलला. त्यांना आपल्या चुकीची लाज वाटायला लागली होती. ते माझ्यासोबत शांततेने आणि संयमाने नाही तर आपुलकीने बोलू लागले. पुढे त्यांनी मला माझ्या कुटुंबाबद्दलही माहिती विचारली. दरम्यान, नील नितीन मुकेशच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाल्यास, तो भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील एका प्रतिष्ठित कुटुंबातून आला आहे. तो बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांचा मुलगा आहे. तर त्याचे आजोबा मुकेश हे सुद्धा प्रसिद्ध गायकांपैकी एक होते. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’; पुष्कर जोगच्या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरने वाढली उत्सुकता…
संगीताची पार्श्वभूमी असूनही नीलने अभिनयाचा मार्ग निवडला. ‘विजय’ (1988) मधून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने ‘जॉनी गद्दार’ (2007) मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्याच्या करिअरमध्ये ‘न्यूयॉर्क’ (2009), ‘लफंगे परिंदे’ (2010), ‘डेव्हिड’ (2013) आणि ‘साहो’ (2019) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, नील नितिन मुकेशचा नुकताच रिलीज झालेला ‘हिसाब बराबर’ हा आर.माधवनची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात नील नितिन मुकेश आणि आर माधवनसोबत कीर्ती कुल्हारी, रश्मी देसाई आणि फैजल रशीद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.