Nitin Desai Death : चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कला दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नितीन देसाई (Nitin Desai ) यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत इथल्या त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये (N.D. studio) त्यांनी आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. दापोली ते जागतिक सिनेमापर्यंत मजल मारणाऱ्या या कला दिग्दर्शकाचा जीवनप्रवास कसा होता जाणून घेऊया.
कोकणातल्या दापोली इथं 9 ऑगस्ट 1965 रोजी नितीन देसाई यांचा जन्म झाला. कला दिग्दर्शक म्हणून नावलौकिक कमावलेल्या नितीन देसाई यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही ओळख निर्माण केली होती.
सिनेसृष्टीत येण्याआधी मुंबईतल्या सर. जे.जे. कला महाविद्यालयात त्यांनी प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. 1987 साली त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो, पानीपत,स्वदेस, यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं. आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी अशा बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलं.
कर्जतमध्ये उभारला एनडी स्टुडिओ
2005 मध्ये नितीन देसाई यांनी कर्जतमध्ये सुमारे 52 एकर जागेत एनडी स्टुडिओ उभारला. जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल, बिग बॉस यासारखे अनेक सिनेमा, रिएलिटी शो या स्टुडिओमध्ये झाले कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ उभारला. नुसतं सिनेमाचं नाही तर मालिकांच्या विश्वातही नितीन देसाईंचा नावलौकिक होता.
डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या राजा शिवछत्रपती या मालिकेची निर्मितीही नितीन देसाई यांनी केली. या मालिकेने त्याने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. शिवरायांचा इतिहास मांडणीरी ही मालिका अल्पावधीतच घराघरात पोहोचली. या मालिकेतील प्रसंगही एन.डी. स्टुडिओमध्येच चित्रीत करण्यात आले होते. वीस वर्षांच्या कारकीर्दीत नितीन देसाई यांना 4 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर 3 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अनेक ऐतिहासिक मालिकांसाठी त्यांनी
भव्य सेट उभारले होते. ऐतिहासिक मालिका, सिनेमा म्हणजे नितीन देसाई हे एक समीकरणंच बनलं. कला दिग्दर्शनात यश मिळायला लागल्यानंतर नितीन देसाई यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला.
अजिंठा या सिनेमाच्या माध्यमातून नितीन देसाई यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. तर बालगंधर्वसारखा गाजलेल्या सिनेमाची त्याने निर्मिती केली. ‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’,’कामसूत्र’,’सच अ लाँग जर्नी’,’होली सेफ’ या हॉलिवूडपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.नितीन देसाई यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांचं स्वप्न साकार केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचं काम केलं. कला दिग्दर्शन या क्षेत्राला ग्लॅमर मिऴवून देण्यात नितीन देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे.
मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी असं म्हणत हॉटस्टारवर येणाऱ्या आणि महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर नितीन देसाई यांनी 26 जानेवारी रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी कुठलीही पोस्ट त्यांच्या फेसबुकवर केलेली नाही. त्यामुळे हीच त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली आहे.