फोटो सौजन्य - Social Media
आध्यात्मिक आणि प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी यांनी नुकतेच ‘इट्स ओके’ हे पुस्तक प्रकाशित करून लेखिका म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. या पुस्तकाद्वारे त्या वाचकांना आयुष्यातील तणावपूर्ण आणि कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन देतात. जया किशोरी यांचं म्हणणं आहे की, या पुस्तकाचं शीर्षक त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे.
त्या सांगतात, “कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मला जाणवलं की अनेक तरुण त्यांच्या भावनिक अडचणी आणि मानसिक संघर्ष बोलून दाखवत असले तरी ‘इट्स ओके’ किंवा ‘जस्ट चिल’ म्हणत सगळं लपवतात. हे खूप विचार करायला लावणारं होतं.”
पाच वर्षांपासून पुस्तक लिहायचं स्वप्न बाळगणाऱ्या जयांनी शेवटी हे स्वप्न पूर्ण केलं आहे. त्या म्हणतात, “या पुस्तकाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना हे शिकवणं की, कोणत्याही परिस्थितीत आपण कधी ‘इट्स ओके’ म्हणावं, आणि कधी नाही, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अडचणी स्वीकारा, त्यांना सामोरे जा आणि मग योग्य तोडगा शोधा.”
या पुस्तकात जयांचे वैयक्तिक अनुभव, बालपणातील आठवणी, आध्यात्मिक विचार, तसेच त्यांच्या आईवडिलांकडून आणि आजीआजोबांकडून ऐकलेल्या प्रेरणादायी कथा यांचा सुंदर संगम आहे. लेखनप्रक्रिया त्यांच्या दृष्टीने भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. अनेक वेळा पुन्हा-पुन्हा लिहावं लागल्यामुळे हा प्रवास कठीण ठरला, पण त्यांनी आपल्या शिकवणीप्रमाणे मनःशांती राखत लेखन पूर्ण केलं.
पुस्तक कोणासाठी आहे, यावर त्या स्पष्टपणे सांगतात, “आजची तरुण पिढी गोंधळलेली आहे, अशांत आहे. त्यांच्या मनाला दिशा देण्यासाठी हे पुस्तक आहे. मात्र कोणताही वाचक, जो आतून अस्वस्थ आहे किंवा भावनिक संघर्ष करत आहे, त्याने हे पुस्तक नक्की वाचावं.” शेवटी त्या सांगतात, “वाचकांनी हे पुस्तक पूर्ण केल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी, जीवनात स्थिरता यावी आणि कोणतीही परिस्थिती आली, तरी मनापासून ‘इट्स ओके’ म्हणता यावं, हीच माझी मनापासून इच्छा आहे.”
या पुस्तकामुळे जया किशोरी फक्त एक आध्यात्मिक वक्त्या नव्हे, तर एक संवेदनशील लेखिका म्हणूनही ओळखली जाईल, यात शंका नाही.