परंपरा आणि गूढतेचा संगम असणारा "रुखवत" चित्रपट कसा आहे ?
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील ‘रुखवत’चा समृद्ध वारसा आणि पुनर्जन्मासारख्या गूढ विषयाचा संगम म्हणजे “रुखवत” चित्रपट. अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप प्रस्तुत आणि राबरी एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट परंपरा आणि रहस्य यांना एकत्र गुंफत प्रेक्षकांना एका अनोख्या प्रवासावर घेऊन जातो.
कथानक
चित्रपटाची कथा एका प्राचीन वाड्यातून सुरू होते, जिथे पुरातत्त्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप शैक्षणिक सहलीसाठी पोहोचतो. त्या वाड्यात सापडलेल्या रुखवतापासूनच चित्रपटाचे कथानक सुरू होते. वाड्यातील जुने बाहुले, त्यांच्याशी जोडलेले गूढ आवाज आणि भासांनी कथा एका रोमांचक वळणावर जात आहे. अमर (संतोष जुवेकर) आणि निशिगंधा (प्रियदर्शिनी इंदलकर) या आवाजांमागील रहस्याचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पुनर्जन्माशी जोडल्या गेलेल्या गूढतेला सामोरे जातात.
अभिनय
संतोष जुवेकरने अमरच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या दमदार अभिनय आणि भावनिक परिपक्वता पात्राला जिवंत बनवते. प्रियदर्शिनी इंडालकर हिने निशिगंधा या भूमिकेतून एक सशक्त आणि संवेदनशील व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांमधील गोष्ट कथेला अधिक जिवंत बनवते. चित्रपटातील सहायक भूमिकांमध्ये अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण, आणि राजेंद्र शिसाटकर यांचे योगदानही महत्त्वाचे ठरते. त्यांच्या अभिनयाने कथानकाला एक गडद आणि वास्तविक स्पर्श दिला आहे. शिवाय प्रभावी बनवलं आहे.
तांत्रिक दृष्टिकोन
दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी सांस्कृतिक धाग्याला गूढतेच्या पटावर लावून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा सादर केली आहे. चित्रपटातील सेट डिझाईन, प्राचीन वाड्याचा वास्तवदर्शी आविष्कार, आणि पारंपरिक रुखवतचे प्रभावी चित्रण हे चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य आहे. संगीताच्या आघाडीवर “ऋतु प्रेमवेडा” हे गाणं सगळ्यांच्या मनाला भिडणारं ठरतं. सोनू निगम आणि बेला शेंडे यांच्या गोड आवाजाने आणि गौरव चाटी यांच्या सुमधुर संगीताने सजलेलं हे गाणं प्रेम आणि ऋतूंच्या बदलत्या छटा उत्तम प्रकारे व्यक्त करतं. विक्रांत हिरनाईक यांच्या कवितेने गाण्यात भावनांची खोलता आणली आहे.
चित्रपटाची जमेची बाजू
कथानकातील गूढता आणि परंपरेचा सुंदर संगम
प्रभावी अभिनय, विशेषतः संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंडालकरचा
“ऋतु प्रेमवेडा” सारखी सुमधुर गाणी
प्रभावी लोकेशन्स आणि सेट डिझाईन
चित्रपट कसा आहे ?
“रुखवत” हा चित्रपट परंपरा आणि गूढतेचा थरार एकत्र आणणारा एक अनोखा सिनेमा आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पुनर्जन्मासारख्या दुर्लक्षित विषयाला प्रगल्भतेने हाताळत प्रेक्षकांना नवीन विचार करायला लावणारा हा चित्रपट नक्कीच एक सुंदर अनुभव आहे.