लग्न जुळवताना ‘३६ गुण’ (36 Gunn) पाहिले जातात. दोघांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकड्याने अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आणि अभिनेत्री पूर्वा पवार (Purva Pawar) यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.
तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Presenting the first poster of our new #Film #36Gunn
Releasing 4th November 2022.
Directed by @samitkakkad @tphquk #SamitKakkadFilms @TheKetki @CafeMarathi @sjuvekar12 @hrishikeshkoli #PurvaPawar @PushkarShrotri @SunshinezStudio #CafeMarathi pic.twitter.com/wm6GXTy5vT
— Samit Kakkad (@samitkakkad) September 26, 2022
घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव यावर ‘३६ गुण’ चित्रपट भाष्य करतो. आजची पिढी त्यांची विचारधारा याचे अतिशय समर्पक चित्रण हा चित्रपट करतो. संतोष आणि पूर्वा यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
‘द प्रोडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स’ निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखील रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.