सध्या अकरावीमध्ये शिकणारी सौम्या डान्समध्ये अतिशय पारंगत आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये सहभागी होण्याबाबत सौम्या म्हणाली की, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर आल्यावर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. इथं आल्यावर खूप चांगल्या माणसांची भेट होणं हे माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरलं. या शोमधील कोरिओग्राफर्स खूप कमाल आहेत. यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. वर्तिकादीदी माझी कोरिओग्राफर आहे. ती नेहमीच डान्समधील बारकावे शिकवत असते. यासोबतच इतर स्पर्धकांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. या शोमधील जजेचची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. परफेक्ट कमेंट्स देतात. कधी काही कुठे चूक झाली तर समजावून सांगतात. ते कशाप्रकारे करायला हवं होतं हे पटवून दिल्यानं पुढल्या वेळी ती चूक होण्याची शक्यता कमी होते. त्यांनी दिलेले धडे कायम मनात ठेवून त्यावर काम करते.
आजवरच्या एपिसोडसमध्ये खूप चांगल्या प्रकारचे परफॅार्मन्सेस सादर करण्यात आले आहेत. मी बेली डान्सला एका वेगळ्याच लेव्हलला नेऊन ठेवलं असल्यानं परीक्षकांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळते. टेरेन्स सरांनी नेहमीच माझा उत्साह वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांनी झप्पी दिली होती. गीतामॅडमनी सजदा दिला होता. मलाईका मॅडमची कौतुक करण्याची शैली काहीशी वेगळी आहे. ते खूप भावतं. बेली डान्स माझा फेव्हरेट आहे. मी बेली आणि हिपॅापचं मिश्रण करून एक वेगळीच डान्सिंग स्टाईल क्रिएट केली आहे. त्यामुळं परीक्षकांना माझ्या डान्सिंग स्टाईलचं खूप अप्रूप वाटतं.
बेली-पॅापचं क्रिएशन
बेली, हिपॅापसोबत सालसा, भरतनाट्यम, व्हॅकिंग अशा वेगवेगळ्या शैलींमध्ये नृत्य करण्याची कला मला अवगत आहे. माझ्या दोन वेगवेगळ्या डान्सिंग स्टाईल्स आहेत. एक आहे पॅापिंग आणि दुसरी आहे बेली डान्स. या दोघांचं मिश्रण करून मी बेली-पॅाप ही वेगळी स्टाईल क्रिएट केली आहे. अशा प्रकारचा डान्स अद्याप कोणी करत नाही. हे माझं स्वत:चं क्रिएशन असल्यानं यात मी अत्यंत सहजपणे डान्स करू शकते. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर अशा प्रकारचं क्रिएटीव्ह सादरी करू शकल्याचा अत्यंत आनंद आहे. याचं परीक्षक, कोरिओग्राफर्स आणि प्रेक्षकांकडूनही खूप कौतुक होत असल्यानं समाधानही आहे.
बालपणापासून डान्सची गोडी
चार वर्षांची असल्यापासून मी डान्स करतेय. त्यावेळी मी नॅार्मल बॅालिवूड डान्सपासून सुरुवात केली होती. त्यानंतर बेली डान्स शिकले. हळूहळू स्वत:मध्ये इम्प्रूव्हमेंट करत डान्सिंगच्या विविध शैली आत्मसात केल्या. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मला लॅाकडाऊननं खूप वेळ दिला. लॅाकडाऊनचा पूर्ण फायदा उचलत मी बेली-पॅाप ही स्वत:ची स्टाईल बनवली. मी पुण्यामध्ये हडपसर येथे रहाते. दस्तूर स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. या शाळेतील शिक्षकांनीही सौम्याला खूप सपोर्ट केला आहे. शाळेत जेव्हा डान्स करण्याची संधी मिळायची तेव्हा शिक्षक मलाच प्रोत्साहित करून सहभागी व्हायला सांगायचे. शाळेतील शिक्षकांनी मला खूप मदतही केली आणि मोटिव्हेट करण्याचं काम केलं. शिक्षक माझ्यासोबत खूप चांगले वागायचे.
आईच बनली पहिली गुरू
माझी आई डान्सर आहे. तिच माझी डान्समधील पहिली गुरू आहे. डान्सचं बेसिक शिक्षण तिच्याकडून घेतलं. बारीकसारीक गोष्टी समजून घेतल्या. तिच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर मी पुढील डान्स शिकण्यासाठी बाहेर क्लासेस सुरू केले. घरातच डान्सचे धडे गिरवायला मिळाल्यानं माझं बेसिक खूप पक्कं झालं. त्यामुळं बाहेर शिकायला गेल्यावर कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. मम्मीनं माझ्याकडून खूप चांगल्या प्रकारे डान्स बसवून घेतला. शाळेत असतानाही ती डान्स स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायची. तिच्यामुळं मी डान्सच्या माध्यमातून इथवर पोहोचू शकले. बेली डान्सचं प्रशिक्षण मी सिराज मॅडमकडून घेतलंय. याचं ट्रेनिंग मी बाहेरून घेतलं. १० वर्षांपासून मी बेली डान्सचं ट्रेनिंग घेतेय.
मम्मी डान्सर, पप्पा डॅाक्टर
माझी मम्मी डाएटिशीयन असून, तिचा स्वत:चा बिझनेस आहे. पप्पा डॅाक्टर असून, त्यांची स्वत:ची जिम आणि क्लबहाऊस आहे. स्विमिंगपूल आणि जिमसह पूर्ण स्पोर्टसक्लब आहे. मी डान्स करावा अशी मम्मीची इच्छा होती. त्यामुळं बालपणीच मला तिनं डान्सिंगचं बाळकडू पाजायला सुरुवात केली. बालपणापासून मला शोजमध्ये सहभागी करण्यासाठी घेऊन जायची. बऱ्याच शोजसाठी प्रयत्न केले, पण संधी मिळाली नव्हती. अखेर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’नं मला स्वत:चं टॅलेंट जगासमोर आणण्याची संधी दिली आहे. मी डॅाक्टर बनावं अशी पप्पांची इच्छा होती. मी फिजिओथेरेपिस्ट किंवा एमबीबीएस डॅाक्टर बनावं असं पप्पांना वाटत होतं. नुकतीच मी दहावी पूर्ण केली असून, सध्या अण्णासाहेब मगर कॅालेजमध्ये सायन्स शाखेत अकरावीचं शिक्षण घेत आहे.
वर्तिकादीदी आयडॅाल
इंडस्ट्रीत खूप फेमस डान्सर्स आहेत, पण या शोमधील माझी कोरिओग्राफर वर्तिकादीदी माझी आयडॅाल आहे. सध्या तरी तिच्यासारखं बनणं हेच माझं स्वप्न आहे. मी तिलाच फॅालो करण्याचा प्रयत्न करतेय. इंटरनॅशनल लेव्हलवरील अमूक एकच डान्सर आवडतो असं नेमकं सांगता येणं शक्य नाही. भारतामध्ये धर्मेशसर, शक्तीमॅडम, राघवभैया यांचा डान्स मला खूप आवडतो. मला भविष्यात डान्समध्येच स्वत:चं करियर करायचं आहे. इथवर पोहोचण्यासाठी बालपणापासून खूप मेहनत घेतली आहे. लॅाकडाऊनचा मला खूप फायदा झाला. मी स्वत:चं काहीतरी क्रिएट करू शकले. पहिल्या लॅाकडाऊनमध्ये पूर्ण दिवस प्रॅक्टीस करायचे. तेव्हापासून आतापर्यंत खूप प्रॅक्टीस करतेय. इथं आल्यावर नॅार्मल स्टाईलपेक्षा बऱ्याच नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी मिळाली. काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळाली. इथं प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यांच्याकडून शिकायला मिळत आहे.
या गोष्टी करणं आवश्यक
‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये आल्यापासून दिवसभर रिहर्सल्स करत असतो. रात्रीच घरी परततो. लॅाकडाऊनमध्ये सकाळी उठायचे. स्कूलचे ऑनलाईन क्लासेस दोन-तीन तास चालायचे. ते संपल्यावर मी लगेच डान्स सुरू करायचे. रात्रीपर्यंत मी डान्सचीच प्रॅक्टीस करायचे. या मंचावर पोहोचण्याचा मार्ग वाटतो तितका सोपा मुळीच नाही. इथवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळं या मंचावर येऊन स्वत:ची स्वप्नं साकार करणाऱ्या डान्सर्सना इतकंच सांगेन की, मेहनतीला नावीन्याची जोड दिलीत तर इथं पोहोचण्याचा मार्ग आणखी सोपा होईल. लोकांना नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायला आवडतं.