शाहरुख खान-सुहाना खान : मागील वर्षी बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने चित्रपट गृहांमध्ये दमदार कमाई केली आणि अनेक रेकॉर्ड सुद्दा मोडले. मागीलवर्षी शाहरुख खानचे पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटांनी चित्रपट गृहांमध्ये धुमाकूळ घातला. अभिनेता शाहरुख खानने अद्याप त्याच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मुलगी सुहाना खानसोबत तो चित्रपट करत असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. यात शाहरुख सुहानाच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत होते. ताजे अपडेट म्हणजे शाहरुखने त्याचा पुढचा प्रोजेक्ट लॉक केला आहे. अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. शाहरुख खान त्याचा पठाण दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत एका ॲक्शन थ्रिलरसाठी पुन्हा एकत्र येत आहे. याचे दिग्दर्शन सुजय घोष करणार आहेत. चित्रपटाचे नाव तात्पुरते किंग असे ठेवण्यात आले आहे.
या नव्या चित्रपटात शाहरुख आपली मुलगी सुहानाच्या वडिलांची भूमिका साकारणार नाही, तर तिच्या गुरूची भूमिका साकारणार आहे, जो सुहानाला धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करेल. चित्रपटाचा भार फक्त शाहरुखच्या खांद्यावर असेल. शाहरुख आणि सुहाना अभिनीत या चित्रपटाची पटकथा अनेक वेळा लिहिली गेली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हा चित्रपट सुहानासाठी मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याची योजना होती, ज्यामध्ये शाहरुख कॅमिओ करणार होता. आता स्क्रिप्ट बदलण्यात आली आहे.
सुहाना खानने ‘द आर्चीज’ या चित्रपटात तिचे अभिनय कौशल्य दाखवले आहे. या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांनीही अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. आर्चीज गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. ‘द आर्चीज’ चित्रपट निर्माते झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. झोया अख्तरने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.