फोटो सौजन्य - Social Media
कधी वाटलं होतं का तुम्हाला की ७४ वर्षांच्या आजीबाई यूट्यूब स्टार बनू शकतात? पण हो, सुमन धामने यांनी हे शक्य करून दाखवलंय! अहमदनगरजवळील सरोला कासार गावातील या आजीबाईंनी ‘आपली आजी’ नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि थेट १७.९ लाख सब्सक्राइबर्सपर्यंत पोहोचल्या! मुळात हा सगळा विचार कुठून आला? तर त्यांच्या १७ वर्षांच्या नातवाने त्यांना एकदा पाव भाजी बनवायला सांगितलं. आणि म्हणाला, “आजी, आपलं जेवण तर अफलातून आहे, का नाही याचा व्हिडिओ करून टाकायचा?” मग काय! आजीने थोडा संकोच करत का होईना, पण हा नवा प्रयोग स्वीकारला.
सुरुवात सोपी नव्हती. कॅमेऱ्यासमोर बोलायला लाज वाटायची. तंत्रज्ञानही माहित नव्हतं. एकदा चक्क चॅनल हॅकही झालं. पण सुमन आजी कुठे थांबणार होत्या? त्यांनी पुन्हा सगळं शिकलं, नव्यानं व्हिडिओ बनवले आणि आपली खास घरगुती, पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. तुम्ही पाहिलंय का त्यांच्या चॅनलवरचे व्हिडिओ? अगदी घरच्या घासासारखं प्रेम त्या प्रत्येक रेसिपीत उतरवत असतात. पाव भाजी, करेलेची भाजी, गोडधोडाच्या पारंपरिक पाककृती… सगळं अगदी अस्सल आणि आपुलकीचं. त्यामुळेच लोक त्यांच्या व्हिडिओंना डोक्यावर उचलून धरतात.
आज सुमन धामने दर महिना ५ ते ६ लाख रुपये कमावतात. पण पैशांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की “स्वप्न पाहायला वय लागत नाही, फक्त जिद्द लागते.” आज त्या केवळ यूट्यूब स्टार नाहीत, तर पारंपरिक मसाले विक्री करत स्वतःचं छोटंसं व्यावसायिक जगही उभं करत आहेत. त्यांची ही गोष्ट आपल्याला सांगते. नवी संधी आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवलात, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि हो, आजी म्हणतात ना, “शिकत रहा, चालत रहा, वय काय फक्त एक आकडा आहे!”
आजींच्या या धाक्कड प्रवासाने अनेक तरुणांना तरुणाई शिकवली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी आजींनी त्यांच्या स्वप्नांसाठी केलेले कष्ट पाहता अनेक तरुणांना आदर्श मिळाला आहे.