तृप्ती डिमरीला Aashiqui 3 मधून का काढलं? दिग्दर्शक अनुराग बसू यांनी जरा स्पष्टच सांगितलं...
‘ॲनिमल’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेल्या तृप्ती डिमरीसाठी २०२४ हे वर्ष खास राहिलं. ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ’, ‘बॅड न्यूज’ आणि ‘भूल भुल्लैया ३’ सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तृप्ती आता लवकरच ‘आशिकी ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तृप्तीने चित्रपटासाठी लूक टेस्ट देऊन चित्रपटाचा मुहूर्त शॉर्टही दिला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसू करणार असून त्यांनी चित्रपटाबद्दल महत्वाचे अपडेट चाहत्यांना दिले आहेत.
‘भूल भुल्लैया ३’नंतर पुन्हा एकदा कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी ‘आशिकी ३’ निमित्त मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, ‘आशिकी ३’चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासू यांनी तृप्ती डिमरी या प्रोजेक्टचा भाग नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार , ‘रोमँटिक चित्रपटासाठी आवश्यक असलेली निरागसता आणि साधेपणा तिच्यात दिसत नसल्यामुळे निर्मात्यांनी तिची निवड केली नाही’ तृप्ती डिमरीला चित्रपटातून वगळल्यानंतरच्या अशा चर्चा होत्या. तर, काही बोल्ड सीन्समुळे तृप्ती ‘आशिकी ३’साठी योग्य नाही, असं काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहेत.
‘आशिकी ३’मधून तृप्तीला काढून टाकल्याच्या चर्चांवर दिग्दर्शक अनुराग बसू यांनी ‘मिड डे’ला मुलाखत दिली आहे. तृप्तीला ‘आशिकी ३’चित्रपटातून काढण्याचे कारण ‘तिच्यात न दिसणारी निरागसता’आहे का ? यावर दिग्दर्शकांनी सांगितलं की, “ते खरं नाही. तृप्तीलाही त्याचं खरं कारण माहिती आहे.” दरम्यान, तृप्तीच्या जागी ‘आशिकी ३’साठी कोणती नवीन अभिनेत्री दिसणार ? याचा सध्या शोध सुरू आहे. चित्रपटाची शूटिंग जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे अपेक्षित आहे.
दरम्यान, तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचं तर, सध्या तृप्ती विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘अर्जुन उस्तरा’चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सुरुवातीला या चित्रपटात तृप्तीबरोबर कार्तिक आर्यन झळकणार होता, पण आता शाहिद कपूर या भूमिकेत दिसणार आहे. विशाल भारद्वाजबरोबर शाहिदने याआधी ‘हैदर’, ‘रंगून’ आणि ‘कमिने’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय. शिवाय, तृप्ती करण जोहरच्या ‘धडक २’मध्येही दिसणार असून ती सिद्धांत चतुर्वेदीसह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.