फोटो सौजन्य - Social Media
जुई गडकरीच्या अभिनय प्रवासात संघर्ष, अपमान आणि त्यावर मिळवलेलं यश या सगळ्यांची एक वेगळी कहाणी दडलेली आहे. अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवताना तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आजही प्रेरणादायी ठरतात. तिचं पदार्पण श्रीमंत पेशवा बाजीराव – मस्तानी या मालिकेतून झालं. खरं तर ऑडिशनसाठी तिची मैत्रीण गेलेली, पण निवड मात्र जुईची झाली आणि इथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. सुरुवातीला ती कर्जतमध्ये राहत असल्याने प्रवास सोपा होता. मात्र पुढे आरे कॉलनी येथे शूटिंग सुरू झाल्यानंतर तिचा दिवस पहाटेपासूनच धावपळीचा व्हायचा.
७ जुलै २०१० हा दिवस जुईसाठी कायम लक्षात राहणारा ठरला. हा तिच्या वाढदिवसाच्या आदल्यादिवशीचा प्रसंग. वीजपुरवठा खंडित झाल्याने तिला कॉल टाइम कळलाच नाही. पहाटे वीज आल्यावर कळलं की सकाळी ६.३० वाजता सेटवर हजर व्हायचं आहे. त्यामुळे तिनं पहाटे चारची लोकल पकडली आणि आरे कॉलनी गाठलं. मात्र दिवसभर वाट पाहूनही तिचा सीन लागला नाही. सकाळपासून रात्री अकरापर्यंत ती तिथेच थांबली.
जेव्हा तिनं ईपींना विचारलं की तिचा सीन होणार आहे का, तेव्हा त्यांनी तिचा अपमान केला. एवढंच नव्हे तर लेखकाला बोलावून तिची भूमिका काढून टाकण्यास सांगितलं. हा प्रसंग जुईसाठी फार त्रासदायक होता. वाढदिवसाच्याच दिवशी तिनं ट्रेन चुकवल्याने स्टेशनवरच रात्र काढली. एकटीच बसून रडताना तिच्या मनात शंका निर्माण झाली होती की खरंच तिनं योग्य क्षेत्र निवडलंय का?
मात्र, या काळोखानंतर जुईच्या आयुष्यात प्रकाश आला. काही दिवसांतच तिला पुढचं पाऊल या मालिकेची ऑफर मिळाली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी तिचा अपमान झाला होता, त्याच ठिकाणी तिच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन उभी होती. हा क्षण तिच्यासाठी आयुष्यभराचं समाधान देणारा ठरला. जुईची कहाणी आजही दाखवते की संकटं कितीही मोठी असली, अपमान सहन करावा लागला तरी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर खरी ओळख तयार होते. तिच्या प्रवासातून आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळते.