मराठी की बॉलिवूड इंडस्ट्री, सई सर्वात जास्त कुठे रमते ?
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर विशेष चाहतावर्ग तयार केला आहे. मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून सईने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सईने बॉलिवूडमध्ये क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटातून डेब्यू केले होते. सध्या सई तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. ‘मानवत मर्डर’ सीरीजच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकरने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. यावेळी तिने मुलाखतीमध्ये, सीरीजमधील तिच्या भूमिकेबद्दल शिवाय आपल्या करियरविषयी दिलखुलास गप्पा सुद्धा मारल्या.
यावेळी अभिनेत्रीला मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुला फरक काय जाणवतो ? असा सवाल विचारला होता. या प्रश्नाबद्दल सई म्हणाली की, “दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये माझा काम करण्याचा अनुभव सारखाच आहे. त्यात कोणताही फरक नाही. पण दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये आपल्याला भाषेची मर्यादा पाहायला मिळेल. मराठी चित्रपट हे फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित असतात. शिवाय भाषेचीही आपल्याला मर्यादा पाहायला मिळते. पण तसं बॉलिवूडमध्ये नसतं. हिंदी सिनेमे अख्खा देश बघतो. सर्व झाल्यानंतर मुद्दा अडतो तो प्रसिद्धीवरच. दोन्हीही इंडस्ट्रीतून मला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे. शिवाय चित्रपटांच्या बजेटमध्येही आपल्याला फार साधर्म्य पाहायला मिळेल.”
सई ताम्हणकर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना आपलंसं केलं आहे. ‘श्री देवी प्रसन्न’, ‘भक्षक’ नंतर ‘मानवत मर्डर’ या सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जादूटोणा, खून आणि रहस्य अशी कथा असलेल्या ह्या सीरीजची कथा मानवत गावातील आहे. १९७२ साली मानवत गावात दीड वर्षांत सात जणांचा खून झालेला असतो. या मर्डर मिस्ट्रीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका खूनाचा शोध या सीरीजमधून घेण्यात येणार आहे.
सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर आणि मकरंद अनासपुरे अशी तगडी स्टारकास्ट या सीरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुख्य बाब म्हणजे, सीरीजमध्ये प्रेक्षकांना मराठमोळ्या कलाकारांचा केव्हाही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे. सीरीजचं दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केलं असून सीरीजची निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी केली आहे. येत्या ४ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत पाहायला मिळणार आहे.