फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडियावर फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरेची मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्याचे कारण स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी दुःख व्यक्त केले होते. अनेकांनी तर हास्यजत्रा पाहण्याचे कारण ‘गौरव मोरे’ आहे असे स्पष्ट केले होते पण गौरवने दरम्यान कार्यक्रमातून रजा घेतली होती. पण दरम्यान तो ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात झळकला होता.
चर्चेत असणाऱ्या मुलाखतीनुसार, गौरवने हास्यजत्रा सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. तो मुलाखतीदरम्यान म्हणाला की “कुणी येऊन म्हणतं की तुमचा रोल मला फार आवडतो. तुम्ही येताच कॉमेडी होते. अनेकदा मला विचारलं जातं की तुम्ही या तारखेला फ्री आहात का? छान रोल आहे. बायको-नवऱ्याच्यामध्ये तुम्ही येणार, समस्या निर्माण होणार आणि मग कॉमेडी होणार. सतत हे करून मी कंटाळलो होतो मला वर्षभराचा ब्रेक हवा होता. त्यामध्ये मला हिंदीकडून बोलावणं आलं आणि मी ‘मॅडनेस मचायेंगे केलं.”
गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यातून फार प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, याच मुलाखतीत त्याने स्पष्ट केले आहे की तो महाराष्ट्राची हास्यजत्राविषयी नेहमी कृतज्ञ राहील. कारण एकवेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे ट्रेन आणि बसचे तिकीट काढायला पैसे नसायचे आणि आता तोच हातात सगळ्यात महागड्या मोबाईल पैकी एक मोबाईल घेऊन फिरतोय. घरी कार आहे, बाईक आहे. या सगळ्या गोष्टी सांगताना हे सगळं हास्यजत्रेची देन असल्याची त्याने सांगितले.
मुलाखतीत त्याने एक किस्सा आवर्जून सांगितला तो म्हणजे एक वेळ होती याच्या परिस्थितीमुळे याचे मित्रही दुरावत होते आणि आता तेच मित्र त्याच्या घरी येऊन त्याच्यासोबत सेल्फी काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात.






