मुंबई (Mumbai). शासनाने भाविकांच्या भावनांचा विचार करून मंदिरे खुली केली. यासह भगवंतांचे दर्शन घेताना सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवण्याचा सल्लाही राज्य शासनाने दिला. मात्र; काही भाविकांनी या सल्ल्यालाच वाटाण्याच्या अक्षदा वाहण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यातील बहुतेक मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळत असून यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. यातच काही जणांनी मास्कचा वापर टाळल्याने कोरोनाची भीती आणखीच वाढली आहे.
मंदिर सुरु करण्यापूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम घालून देण्यात आले. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवत राज्यातील मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासारखे नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती वर्तवली जात आहे.
आज रविवार असल्याने शिर्डीत हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक भाविक विना-मास्क रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन शिर्डी साई संस्थानकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही भाविक ऑनलाईन बुकींग न करता ऑफलाईन पास घेत असल्याने दर्शन व्यवस्था कोलमडली आहे.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारची सुट्टी असल्याने राज्यभरातून भाविक तुळजापूरला दर्शनासाठी झाले आहेत. तुळजाभवानी मंदिरातील 4 हजार दर्शन पासची मर्यादा संपली असली तरी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. कोरोना लॉकडाऊननंतर पहिला रविवार असल्याने मंदिरात गर्दी होत असल्याचे दिसत आहे.
तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंचा पुरता फज्जा उडाला आहे. तर अनेक भाविक, पुजारी, व्यापारी मास्कविना खुलेआम फिरत आहे. मंदिरे उघडल्यानंतर भाविक कोरोनाची कोणतीही पर्वा न दर्शनासाठी येत आहेत. मंदिरात 10 वर्षाखालील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना खुलेआम प्रवेश दिला जात आहे. तसेच अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याने आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा
कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरात आज अनेक भाविकांनी गर्दी केली होती. गेल्या 9 महिन्यात आज प्रथमच रविवारी मंदिर खुले होते. त्यामुळे जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी ही कुणकेश्वर मंदिरात जात दर्शन घेतले. त्यामुळे अनेक ठिकाणी दर्शनाची रांग लागली होती.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील हनुमान मंदिर आठ महिन्यापासून बंद होते. मात्र मंदिर पुन्हा खुली झाल्यानंतर शनिवार आणि रविवार या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे याठिकाणी मंदिर प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा नियम, मास्कचा वापर, रूट स्कॅनिंग आणि स्वच्छता यासारख्या अनेक उपाययोजना या ठिकाणी केल्या जात आहे.
अनेक वारकरी दर्शनासाठी पंढरपुरात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 26 नोव्हेंबर रोजी होणारा कार्तिक एकादशी यात्रेचा सोहळा प्रशासनाने प्रतिकात्मक रित्या साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 25 आणि 26 नोव्हेंबरला पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे काही वारकरी त्यापूर्वीच मंदिर परिसरात जात दर्शनासाठी गर्दी केली आहे. विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय मुखदर्शनला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अनेक भाविक नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेत आहेत.