आज सोमवार! चंद्राला पांढरा-सफेद रंगाचे वस्त्र जास्त प्रिय असल्याचे मानले जाते. म्हणून सोमवारी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राला प्राधान्य दिले जाते.
पांढरा रंग शांती, मांगल्य, स्वच्छता, पवित्रतेचा, निरागसता चा निदर्शक…. सर्जनशीलतेची इच्छा… आनंदी राहणे आणि आनंद निर्माण करण्याची वृत्ती सेवाभावी वृत्ती आणि समाजकार्याची आवड संघर्ष टाळून सुंसवाद साधणे याचे द्योतक…
नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्विकता या रंगातून प्रतीत होते. सगळ्यात शांत रंग म्हणून तो मानला जातो. तसेच तो शुद्धतेचे प्रतीक म्हणूनही मानला गेला आहे. बऱ्याच देशांमधल्या वधू विवाह सोहळ्यात पांढऱ्या रंगांचे वस्त्र परिधान करतात. काही संस्कृतींमध्ये सत्य व स्पष्टवक्तेपणा दर्शवण्यासाठी पांढरा रंग वापरतात…
शास्त्रीयदृष्ट्या पांढरा रंग हा रंग नसून इतर सगळ्या रंगांचे मिश्रण आहे. खोलीला पांढरा रंग दिल्यास खोली मोठी वाटते
मानसशास्त्रीय दृष्ट्या पांढरा हा जुने सगळं पुसून नवीन सुरुवात करण्याचा रंग आहे…. थोडक्यात पाटी कोरी करून नव्याने अक्षरं गिरवण्याचा…
या रंगाला प्रथम पसंती देणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावात सकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो. स्वभावात मोकळेपणा, इतरांना समजून घेण्याची वृत्ती असते.
मला स्वतःला हा रंग समस्त संसारी स्त्रियांचं प्रतिक वाटतो.
पांढरा रंग शांततेचं द्योतक आहे… शांतता आणि स्त्रिया?
काहीतरी गफलत होतीये का?? नाही, कारण…
“शास्त्रीयदृष्ट्या पांढरा रंग हा रंग नसून इतर सगळ्या रंगांचे मिश्रण आहे”…. अशीचं तर असते ना प्रत्येक संसारी स्त्री … अनेक रंगाचं मिश्रण तरीही कुठेही सामावून जाणारी…. कालचा दिवस विसरून रोज नव्या उमेदीने संसाराचा गाडा ओढणारी… अनेक गोष्टी मनात बंदिस्त करून त्याचा आपल्या रंगावर कुठेही प्रभाव न पडू देणारी…. रोजच मनाची पाटी कोरी करून दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने आयुष्याचा उत्सव साजरा करणारी…
स्त्री म्हणजे जणू पांढरी रांगोळी! पांढरी रांगोळी कशी असते? पुर्ण रांगोळी तिच्यामुळे बनते पण एकदा त्यात रंगाची कलाकुसर झाली की ते रंगच किती उठून दिसतात. असे असले तरी त्या सगळ्या रंगाना एकत्र ठेवायला परत पांढरी रांगोळीचं लागते… तशीच एक संसारी स्त्री, घरातल्या, आजूबाजूच्या सर्वांचा समतोल राखून आपल्या घराचे रंग उठावदार करते…. इथे संसारी म्हणजे केवळ लग्न झालेली असा अर्थ अभिप्रेत नाही तर कोणत्याही प्रकारे संसाराचा भार वाहणारी स्त्री….
यात जशा गावाकडच्या शेती, जनावरे, दुध-दुभतं, सणवार सांभाळणाऱ्या स्त्रिया येतात तशाच शहरातल्या ही…घर-दार, नातेवाईक, आलेगेले पै पाहुणे, घरातला ताळेबंद, घरातल्यांची मर्जी, आवडीनिवडी, हे करतानाच नोकरी किंवा व्यवसाय अथवा अशा अनेक आघाड्या संभाळत संसारी स्त्री आयुष्याचा उत्सव साजरा करते… आजचे देवीचे रुप स्कंदमाता! तशाच या संसारी स्त्रिया! करुणामायी पण सिंहावर आरूढ आणि कर्तव्यदक्ष!
अशा या स्त्रियांना सर्वसामान्य स्त्रिया कोण म्हणेल? या तर अष्टभुजा!
रश्मी पांढरे
(लेखिका ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)







