पुण्यातील गणेशोत्सव हा जगात लोकप्रिय आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे भक्त देखील मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरातून देखाव्याच्या ठिकाणी नेण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विष्णूच्या रथामध्ये गणपतीची मूर्ती मखरामध्ये विराजमान करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Dagdusheth Halwai Ganpati pune news
पुण्यातील लोकप्रिय दगडूशेठ हलवाई गणपतीची मोठ्या दिमाखामध्ये आगमन मिरवणूक काढण्यात आली. मुख्य मंदिर ते देखाव्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.
या आगमन मिरवणूकीमध्ये श्री गणेशाची मूळ मूर्ती ही गाभाऱ्यामधून बाहेर काढून बैलगाडीमध्ये बसवण्यात आली. पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यामध्ये बसवून मिरवणूक काढण्यात आली.
यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा देखावा पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याच विष्णूचा रथ हा आगमन मिरवणूकीमध्ये देखील वापरण्यात आला.
आगमन रथाचे वैशिष्ट्य म्हणजे रथ हा पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आला असून फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर रथावर असणाऱ्या शेषनागधारी विष्णूची प्रतिमा ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
१३३ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ मोठ्या उत्साहामध्ये आणि गणरायाच्या जल्लोषामध्ये झाला. यावेळी लाखो पुणेकर, भाविक आणि कार्यकर्ते हे सोहळ्यासाठी उपस्थित होते.
गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.
मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता.
आगमन मिरवणुकीनंतर पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.