सोनं, चांदी, प्लॅटिनम दागिन्यांसोबतच मोत्याच्या दागिन्यांना भारतासह जगभरात विशेष महत्व आहे. मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. लिखित इतिहासाच्या खूप आधीपासून जुने रत्न आणि मोत्यांचा शोध लागला होता. सर्वप्रथम मोती समुद्रकिनाऱ्यावर अन्न शोधणाऱ्या लोकांनी शोधले होते. त्यानंतर मोती दागिन्यांमध्ये दिसू लागले. रोमन काळापासून मोती ही एक महत्त्वाची व्यापारी वस्तू आहे. १५ व्या आणि १६ व्या शतकात मध्य आणि दक्षिण अमेरिकेत मोत्यांच्या शोधामुळे मोती युगाची सुरुवात झाली. त्यानंतर १९ व्या शतकापर्यंत पश्चिम युरोपमध्येखानदानी आणि राजघराण्यातील महिला मोत्यांचे नेकलेस, कानातले, मोत्याच्या बांगड्या आणि ब्रोचेस घालत होत्या, ज्यामुळे मोत्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली. चला तर जाणून घेऊया मोती दागिन्यांचा रंजक इतिहास. (फोटो सौजन्य – pinterest)
"रत्नांची राणी" म्हणून ओळखले जाणारे मोती जगभरात आहेत प्रसिद्ध!

मोती हा अतिशय कठीण आणि चमकणारी वस्तू आहे जी जिवंत कवच असलेल्या मोलस्क किंवा जीवाश्म कोन्युलॅरिड्स सारख्या इतर प्राण्यांच्या मऊ ऊतींमध्ये तयार होते. मोती कॅल्शियम कार्बोनेट प्रामुख्याने अरागोनाइट किंवा अरागोनाइट आणि कॅल्साइटचे मिश्रणापासून बनतात.

मोती दागिन्यांचा उल्लेख प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीपासून ते भारतीय आणि महाराष्ट्रीयन परंपरेपर्यंत आहे. प्राचीन काळात मोती हे दैवी किंवा राजेशाहीचे प्रतीक मानले जायचे. आकर्षक आणि बहुउपयोगी रत्न म्हणून सगळीकडे मोत्यांची ओळख आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत १०० फूट खोल जाऊन मोती गोळा केले जायचे. एक टन शिंपल्या जमा केल्यानंतर त्यातून केवळ ३ किंवा ४ अस्सल मोती मिळत असे. गोळा केलेले मोती राजघराण्यांतील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.

नैसर्गिक मोती दुर्मिळ रत्नांपैकी एक आहेत. किंमतीने महाग असलेले मोती कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर परिधान केल्यास अतिशय सुंदर लुक येतो . मोत्याच्या दागिन्यांना बाजारात खूप जास्त मागणी आहे.

वेगवेगळ्या रंगांचे अस्सल मोती जगभरातील नद्या, समुद्र इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधून काढले जातात. अस्सल मोती कधीच खराब होत नाही.






