आजच्या काळात पृथ्वीवर पाप, अन्याय आणि अत्याचार यांचा थैमान माजलेला दिसतो. प्रत्येकजण म्हणतो “हेच तर कलियुग आहे!” खरंच, शास्त्रांनुसार कलियुग हेच ते युग आहे जिथे अधर्म सर्वाधिक वाढतो आणि माणुसकी हळूहळू नष्ट होऊ लागते.
कलियुग कधी संपणार! (फोटो सौजन्य - Social Media)

पुराणांमध्ये लिहिलं आहे की, कलियुगात बाप मुलाचा नसेल आणि मुलगा बापाचा नसेल. म्हणजेच नातेसंबंध, प्रेम आणि विश्वास या सगळ्या गोष्टींमध्ये फट पडेल.

सुरुवात झाली होती सत्ययुगापासून, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग १७,२८,००० वर्षांचे होते आणि त्या काळात सत्य, धर्म आणि ज्ञान यांचे राज्य होते. यानंतर आले त्रेतायुग, प्रभू श्रीरामांचा काळ, या युगाची लांबी होती १२,९६,००० वर्षे. त्यानंतर आले द्वापरयुग, श्रीकृष्णांचा काळ, ज्याचे कालमान ८,६४,००० वर्षे होते.

आणि आता चालू आहे कलियुग, ज्याचे एकूण आयुष्य ४,३२,००० वर्षे असल्याचे पुराणांमध्ये नमूद आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून निरोप घेतल्यानंतर म्हणजेच सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी (इ.स.पू. ३१०२) कलियुगाची सुरुवात झाली.

म्हणजे आपण सध्या अजूनही कलियुगाच्या पहिल्याच टप्प्यात आहोत! याचा अर्थ: अजून ४,२६,९०० वर्षे या युगाचा काल बाकी आहे.

कलियुग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि पृथ्वीवर धर्म, सत्य आणि सद्गुणांचा नवा काळ येईल, असं शास्त्र सांगतं.






