सिन्नरला भंगार दुकानाला भीषण आग (संग्रहित फोटो)
सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेच्या कानडी मळ्याच्या पुढे असलेल्या डंपिंग ग्राउंडजवळील भंगार दुकानाला दोन दिवसांपूर्वी सकाळी भीषण आग लागली. या अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी सुमारे ९.३० वाजता लागलेली आग तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी ३.३० वाजता नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या आगीत अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. सिन्नर नगरपरिषद हद्दीत लक्ष्मण दशरथ लोंढे यांचे भंगार दुकान आहे. प्लास्टिक डबे, बाटल्या, कागद व इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, सागर डावरे व वैभव केदार या जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा
आगीची तीव्रता लक्षात घेऊन अतिरिक्त मदतीसाठी एमआयडीसी अग्निशमन दलाचा बंबही बोलावण्यात आला. दोन्ही दलांच्या वाहनांनी पाण्याच्या सुमारे सहा फेऱ्या केल्यानंतर अखेर दुपारी आग नियंत्रणात आली. प्राथमिक अंदाजानुसार, आगीत मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य जळून खाक झाले असून, नुकसानाचा आकडा लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
भट्टीतून लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक
दुसऱ्या एका घटनेत, कराड शहरातील आझाद चौक परिसरात रात्रीच्या सुमारास सोन्या-चांदीच्या आटणी गाळणी दुकानाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. भट्टीतून लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने नागरिकांचे प्रसंगावधान आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
हेदेखील वाचा : Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल






