भाजपमधले ९० टक्के लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप; खडसेंनी भाजपला पुन्हा आरसा दाखवला
Pandharpur News: “पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त अशी होती. परंतु आजच्या घडीला भाजपमध्ये ९० टक्के लोक हे बाहेरचे असून, त्यांच्यावर विविध स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खडसे म्हणाले, “एकेकाळी भाजपमध्ये कुणावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, की त्याला तात्काळ जबाबदारी सोडावी लागत असे. माझ्यावर आरोप झाल्यावर मी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र आजच्या भाजपमध्ये ईडी चौकशीस तोंड देणारे किंवा कारागृहात जाऊन आलेले लोकही पक्षात घेतले जात आहेत.”अशी टीकाही त्यांनी केली आहे.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी एकनाथ खडसे हे रविवारी आले होते.तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खडसे म्हणाले की, “ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती. ते आज पक्षात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तेही आज भाजपसोबत सत्तेत बसले आहेत. त्यामुळे भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला आहे. मी अंधारात असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबतच मी राहणार आहे, असेही एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का? असे विचारले असता खडसे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चिट दिली. यासाठी फडणवीस यांना एकट्याला दोष देणे चुकीचे आहे. या प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते भाजपच्या या अवस्थेला जबाबदाक असल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. तसेच, मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर महाजन कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावरही खडसेंनी टीका केली.
भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे. तसेच सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यानाराजीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावला आहे. सुधाकर बडगुजर पक्षात घेतल्यानंतर खडसे म्हणाले की ‘बडगुजर यांच्यापेक्षा मी वाईट नाही, मग मला का घेत नाहीत?’ यावरून एकनाथ खडसे पक्षात येण्यासाठी किती उत्सुक आहेत, हेच स्पष्ट होतं.”
“मी लहान कार्यकर्ता आहे. खडसे दिल्लीत बोलले. त्यांचं कनेक्शन दिल्लीत आहे. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही, ते राष्ट्रीय नेते आहेत,” अशी सूचक टिप्पणी करत त्यांनी खडसेंना सावरत टोमणा मारला. “खडसे यांनी एकदा दिल्लीत भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकल्याचं म्हटलं होतं, पण त्याचे फोटो आजपर्यंत समोर आलेले नाहीत,” असा सवालही उपस्थित केला. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खडसेंच्या पुनर्प्रवेशावर नवा चर्चेचा विषय तयार झाला आहे.