अमेरिकेने सांगितला इराणवरील हल्ल्याचा प्लॅन
Washington : अमेरिका इराण-इस्रायल युद्धात सामील झाली आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची कबुलीही दिली. यानंतर आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने इराणवरील हल्ल्याची संपूर्ण माहिती जगासमोर सादर केली आहे. अमेरिकेने हल्ल्यासाठी किती आणि कोणती शस्त्रे वापरली हे त्यात सांगितले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणी अणुस्थळांवर हल्ला करण्याच्या मोहिमेत १२५ विमानांचा समावेश होता. त्यात सात बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स होते. त्यांनी इराणच्या तिन्ही अणुऊर्जा केंद्रांवर १३,६०८ किलो वजनाचे बस्टर बॉम्ब टाकले. इराणच्या सर्वात महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्र असलेल्या फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण साठा टाकण्यात आला.
इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणला धमकी दिली. हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केले आहे आणि त्यावर बॉम्ब टाकले आहेत. आता इराणने आता आपले अणुकार्यक्रम थांबवावेत आणि शांतता करार करावा. जर त्यांनी हे केले नाही तर आम्ही आणखी मोठे हल्ले करू.
त्याच वेळी, इराणने अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे पाऊल उचलून अमेरिकेने आमचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही अमेरिकेला दिला आहे. या हल्ल्यानंतर, इराणला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की अमेरिकेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल आणि आता पश्चिम आशियातील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य असेल.
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाचा आज १० वा दिवस आहे. अमेरिकास्थित ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीनुसार, १३ जूनपासून इराणमध्ये ६५७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या माहिती नुसार, ४३० नागरिकांचा मृत्यू झाला आणि ३,५०० लोक जखमी झाले. तर, इस्रायलमध्ये २१ जूनपर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.