(Photo Credit- X)
महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगरावरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोड होत असलेल्या परिसराला भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Aaditya Thackeray)
प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत. याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
‘तुम्ही मेगावॅट म्हणताय, पण इथे मेगा वाट लावताय,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. प्रकल्पासंदर्भात सार्वजनिक सुनावणी झाली होती का, स्थानिकांनी घेतलेल्या हरकतींचं काय झालं आणि पर्यायी जागांचा विचार करण्यात आला होता का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
साय डोंगरातील जंगल वाचवण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘मरण आलं तरी चालेल, पण हा लढा थांबता कामा नये,’ असं म्हणत त्यांनी स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलनासारखा मार्ग स्वीकारण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
टोरंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पावरून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं समोर येत आहे. झाडतोडीमुळे जंगल, जैवविविधता आणि परिसरातील पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती आंदोलक व्यक्त करत आहेत.
आता या प्रकल्पाबाबत सरकार आणि संबंधित कंपनी काय भूमिका मांडतात, तसेच स्थानिकांच्या हरकतींवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याची मागणी या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आली आहे.






