Amit Shah : खऱ्या संसदेत राहुल गांधींचा नंबर कधीच लागणार नाही; अमित शाहांचा घणाघात, सौजन्य : आयएएनएस
रविवारी इंडिया आघाडीच्या वतीने दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर सत्तेतील नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्याचअनुषंगाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही जोरदार टीका केली. राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान व्हायचे असेल, तर त्यांनी संपूर्ण आयुष्य मॉक पार्लमेंटमध्ये घालवावे. कारण खऱ्या संसदेत पंतप्रधान होण्याची त्यांची वेळ कधीच येणार नाही, असा खोचक टोला यावेळी शाह यांनी लगावला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या मॉक ‘महाभियोग कार्यवाही’च्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी ही टीका केली. राहुल गांधी गेल्या 15 वर्षांपासून निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करत आहेत. मुलाला पंतप्रधानपदी पाहण्याचे त्यांच्या आई सोनिया गांधी यांचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नसल्याचेही शाह म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना शाह यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याची अपेक्षा सोडून द्यावी, असे वक्तव्य केले. त्यांच्या पंतप्रधान होण्याची शक्यता केवळ मॉक पार्लमेंटपुरतीच मर्यादित असल्याचा टोलाही त्यांनी गांधी यांना लगावला.
1984 मधील शीखविरोधी दंगलींच्या पीडित कुटुंबांच्या जखमांवर मीठ चोळल्याचा आरोप करत अमित शाह यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या रॅलीवरही टीका केली. 1 नोव्हेंबर 1984 रोजी काँग्रेसने दिल्लीत हजारो निरपराध शिखांचे हत्याकांड घडवून आणले. त्याच दिवशी राहुल गांधी यांनी दिल्लीत रॅली आयोजित केली. हा पीडित कुटुंबांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असे शाह म्हणाले.
हत्याकांडाच्या दिवशी रॅली आयोजित केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचा निषेध केला. राहुल गांधी यांच्या असंवेदनशीलतेमुळे ‘मोहब्बत की दुकान’मधून लोकांना प्रेमाऐवजी द्वेषच मिळेल, अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दोषी काँग्रेस नेत्यांविरोधातील प्रकरणे पुन्हा उघडली आणि त्यांना तुरुंगात पाठवले, असा दावा शाह यांनी केला. तसेच पीडित कुटुंबांना नुकसानभरपाई आणि नोकऱ्या देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शीख संघटना आणि भाजपने रॅली आयोजित न करण्याचे आवाहन केले होते. तरीही राहुल गांधी यांनी रविवारी रॅली घेण्याचा निर्णय घेतला, असा आरोप शाह यांनी केला. दिल्लीतील व्यापाऱ्यांनीही दिवाळीनंतर रॅली घेण्याची विनंती केली होती. रॅलीमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, राहुल गांधी यांना शीख हत्याकांडाच्या दिवशीच रॅली घ्यायची होती, असे शाह म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी 1984 च्या शीखविरोधी दंगलींच्या निषेधार्थ पश्चिम दिल्लीत भाजपने आयोजित केलेल्या मार्चचे नेतृत्व केले. ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ हा संदेश देणे आणि दंगलग्रस्त कुटुंबांशी एकजूट दर्शवणे हा या मार्चचा उद्देश होता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पुरी यांनी 1984 च्या दंगलींच्या आठवणी सांगितल्या. त्या काळात त्यांचे आई-वडील दिल्लीत होते. त्यांच्या काही हिंदू मित्रांनी त्यांना आपल्या घरी आश्रय दिला होता. यातून मानवता आणि बंधुभावाचे दर्शन घडल्याचे त्यांनी नमूद केले.
Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?
हे हत्याकांड केवळ एका समुदायाची शोकांतिका नव्हती, तर देशाच्या इतिहासावर उमटलेली अशी जखम होती, जी कधीही विसरता येणार नाही, असे पुरी म्हणाले. मानवतेचे रक्षण करणे, पीडितांना न्याय मिळवून देणे आणि राष्ट्रीय एकता मजबूत करणे, ही या वेदनादायी इतिहासातून मिळणारी सर्वात मोठी शिकवण असल्याचेही त्यांनी सांगितले.
Ans: राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे असेल, तर त्यांनी मॉक पार्लमेंटमध्येच राहावे. खऱ्या संसदेत त्यांचा नंबर कधीच लागणार नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
Ans: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आयोजित केलेल्या मॉक महाभियोग कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.
Ans: 1 नोव्हेंबर 1984 रोजी झालेल्या शीखविरोधी दंगलींच्या स्मृतिदिनी काँग्रेसने दिल्लीमध्ये रॅली आयोजित केल्याबद्दल शाह यांनी नाराजी व्यक्त केली.






