फोटो - सोशल मीडिया
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असताना दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी खासदारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदारांनीही मोदींची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
अमोल कोल्हे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी आठही लोकसभा मतदारसंघांशी संबंधित विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडण्यात आले.
या भेटीत नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प, इंद्रायणी मेडिसिटी आणि चाकण एमआयडीसी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणीही पंतप्रधानांसमोर मांडण्यात आली. निलेश लंके यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडल्याचेही कोल्हे यांनी सांगितले. यावेळी राजकीय मुद्द्यांपेक्षा पॉलिसी मेकिंग आणि मतदारसंघातील विकासकामांवर अधिक चर्चा झाली, असा दावा त्यांनी केला.
चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा मुद्दाही कोल्हे यांनी उपस्थित केला. रस्त्याच्या कामासाठी ५९ कोटी रुपयांचे टेंडर निघूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. या समस्येबाबत राज्य सरकारला अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे सांगत कोल्हे यांनी अपघातांमध्ये नागरिकांचे जीव गेल्याचा मुद्दाही उपस्थित केला. पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी पक्षाच्या खासदारांनी आज माननीय पंतप्रधानांची भेट घेतली. प्रलंबित प्रश्न आणि जनतेच्या समस्या पंतप्रधानांसमोर मांडल्या. भेटीनंतर संसदरत्न खासदार मा. डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर… pic.twitter.com/iLkCVpu5oz — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 10, 2026
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीचा संबंध आगामी डीलिमिटेशन विधेयकाशी किंवा संभाव्य राजकीय समीकरणांशी जोडू नये, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. “डीलिमिटेशन संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. जे बिल अद्याप आलेलेच नाही, त्यावर आधीच कयास बांधणे योग्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसंच या भेटीत पक्षप्रवेश किंवा एनडीएमध्ये जाण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आठही मतदारसंघांतील प्रश्न केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेण्यात आली, असं कोल्हे यांनी सांगितलं.
चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केल्याचेही अमोल कोल्हे यांनी सांगितले. आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केल्याने या चर्चांना तूर्तास पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.






