भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती असली, तरी या युतीतील अंतर्गत राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये रविवारी संध्याकाळी प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी (दि.14) शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का देत कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी नगरसेवक आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले अनंता पावशे यांना पक्षात प्रवेश दिला. अनंता पावशे यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे यांची युती असली, तरी युतीतीलच पक्षांकडून एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्याचे सत्र सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या पळवापळवीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार आगामी नवरात्रीपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेसेनेतील एका बड्या नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडे विधानसभेतील २० आमदार आहेत. यापैकी १४ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या १४ आमदारांची नावे अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाहीत. त्यामुळे नेमके कोणते आमदार पक्षांतर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.






