अंजली दमानियांना संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची माहिती देणारी ती व्यक्ती कोण; पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर
मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन जोरदार वातावरण तापले आहे. बीडचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे लातूर बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोप देखील अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी घेरले आहे. तसेच या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्किम कराड हा देखील फरार असल्यामुळे तसेच त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले आहेत. वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यामधील अर्थिक जमीनीचे व्यवहार आणि संबंध त्यांनी उघड केले होते. तसेच परवानाधारक बंदुक असणाऱ्या लोकांची यादी देखील अंजली दमानिया यांनी बाहेर आणली होती. त्याचबरोबर वाल्मिक कराड याचा बंदुक हवेत फिरवताना व्हिडिओ देखील अंजली दमानिया यांनी पोस्ट केला होता. त्यामुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व आरोपानंतर आता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्कमुळे कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर त्या इसमाने मला व्हॉईस नोट पाठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली”, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “हे ऐकून मी हबकलेच. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी तिघांचा खून झाल्याची माहिती अनोळखी इसमाने दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे.” या माहितीची मी खातरजमा केलेली नाही आणि फोन करणारा अनोळखी माणूस कोण आहे, याचीही माहिती नसल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आज (दि.28) या मूक मोर्चामध्ये साधारण 50 गावांचे लोक सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. या मोर्चामध्ये राजकीय नेते देखील असणार आहेत. मात्र अंजली दमानिया या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सामील होत आहेत. हे सर्व राष्ट्रवादीत असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे, हे माहीत होते. आधी पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते, मात्र आता पक्ष बदलल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे मोर्चे काढत आहेत. हे सर्व राजकारण असून खरंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून वेगळे आंदोलन उभे करण्याची गरज आहे, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.