म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा, विरोधकांचा सुपडासाफ
म्हसवड / महेश कांबळे : म्हसवड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालामध्ये भाजपने पहिल्याच फेरीपासून आघाडी घेत म्हसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला असून, विरोधकांना पराभवाची धूळ चारताना नगराध्यक्षपदासह सर्व ठिकाणी विजय मिळवत विरोधकांचा पुरता सुपडासाफ केल्याने भाजपचा हा एकतर्फी विजय झाल्याचे दिसून येते.
२ डिसेंबर रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत २१ जागेसाठी ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. यामध्ये म्हसवड पालिकेचे नगराध्यक्षपद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी ३ महिला निवडणुकीच्या उतरल्या होत्या. या निवडणुकीत भाजपकडून पुजा सचिन विरकर, सिध्दनाथ नागरिक आघाडीकडून भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने तर बहुजन समाज पार्टीकडून रुपाली वाल्मिक सरतापे या तिन महिला निवडणुक लढवत होत्या. तर इतर १० प्रभागातून काही अपक्षासह भाजप, शिवसेना व ठाकरे गट असे उमेदवार काही उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावित होते.
निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिल्याच फेरीपासून भाजपने विजय मिळवत घेतलेली आघाडी सर्वच प्रभागात कायम राहिली. प्रभाग १ भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर यांनी घेतलेली आघाडी पुढील सर्वच प्रभागातुन वाढतच गेली. कोणत्याही प्रभागातुन त्यांची आघाडी कमी न झाल्याने पुजा विरकर यांना ग्रामीण मतदारांसह शहरी मतदारांनाही मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसुन आले.
हेदेखील वाचा : Local Body Election : मेढा नगरपंचायत निवडणुकीत ‘धनशक्तीचाच’ विजय; शिवसेना-भाजप दुरंगी लढत
प्रभाग क्र. १ पासुन भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कोणत्याच प्रभागात कमी झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर या ५१७३ मतांनी विजयी झाल्या, तर भाजपच्या सर्व उमेदवारांनीही एकतर्फी विजय मिळवत पालिकेची सत्ता हाती घेतली आहे.
म्हसवड पालिकेची निवडणुक जाहीर झाल्यापासुनच भाजपचे ग्राम विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती, २१ / ० करुन पालिकेची सत्ता हाती घेणार असल्याचे ते आपल्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगत होते, त्यानुसार त्यांनी व्यूहरचना करत प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. आपल्या विश्वासु सहकार्यांसह प्रचाराचे नेटके नियोजन करीत मंत्री गोरे यांनी विरोधकांना सर्वच ठिकाणी धोबीपछाड देत पालिकेवर एकहाती भाजपचा झेंडा रोवला आहे.






