Local Body Election Result 2025 : मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू; विजय निश्चित असल्याचा विश्वास (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीचे मतदान 2 डिसेंबर रोजी झाले होते. तर काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान शनिवारी पार पडले. असे असताना आता या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी सुरु झाली. त्यात अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे.
सोलापूर येथे सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात एकूण 98 टेबलांवर मतमोजणी पार पडत आहे. प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण साडेचारशे कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सर्व नगरपरिषदेत भाजपने निवडणूक लढवल्या आहेत. अक्कलकोट येथे भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर शहरात लावले आहेत. भाजप उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी अभिनंदन करणारे पोस्टर लावले आहेत.
दरम्यान, शहरातील चौकाचौकात हे बॅनर लागले आहेत. अक्कलकोट येथे भाजपाविरुद्ध शिंदेसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. याठिकाणी अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मात्र, मतमोजणीपूर्वीच विजयाचे बॅनर झळकावत भाजप कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास दाखवला आहे. सोलापूरातील अक्कलकोट येथे मतमोजणीआधीच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी
फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. त्याशिवाय निकालापूर्वीच अभिनंदनाचे बॅनर्स झळकले आहेत. त्यातून भाजप कार्यकर्त्यांचा अतिउत्साह दिसून येत आहे.सर्व नगरपरिषदांमध्ये एकही टपाल मतदान न झाल्याने टपाल मते मोजण्यासाठी स्वतंत्र टेबल नसणार आहे. त्यामुळे मोजणीची प्रक्रिया अधिक वेगाने होताना दिसत आहे.






